मुंबई - प्रश्न विचारणारा विरोधी पक्ष न राहिल्याने सत्ता आणि बहुमताची भाजपला मुजोरी आलेली आहे, असा हल्लाबोल आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भांडुप पूर्वच्या सभेत केला. विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार विनोद शिंदे यांच्यासाठी त्यांनी प्रचारसभा घेतली. एक चांगला आणि सक्षम पर्याय म्हणून मनसेच्या शिलेदारांना निवडून आणा. विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्यास मी तयार आहे, असे ते म्हणाले.
ग्रामीण भागात सकाळी सभा होतात. मात्र, शहरी भागात संध्याकाळी सभा घ्याव्या लागतात. भांडुप भागात वाहतूक कोंडी, छोटे रस्ते आहेत. लोक कशी जगत आहे. राग व्यक्त करण्यासाठी काय करतात तर ट्विट करतात. परदेशात बघा कसे रस्ते आहेत. लंडनमधील काही किस्से या वेळी राज ठाकरे यांनी सांगितले. लंडन येथे एक मुलगा भेटला होता. तेव्हा त्याने मला एक टेंडर दाखवले. त्यामध्ये एक अट होती. घर बनवताना सूर्य प्रकाश पोहचावा अशी अट होती, असे राज यांनी सांगितले.
आमच्याकडे काय सगळं काही भकास करून ठेवले आहे. बाहेरचे लोक येत आहेत. कुठेही राहत आहेत. झोपडपट्टी वाढत आहेत. इथे राहणाऱ्या आमच्या मुलांना अॅडमिशन मिळत नाही. आरक्षण शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आहे. आज शिक्षण संस्था पाहिल्या तर खासगी संस्था 90 टक्के आहेत. नोकऱ्या कुठे आहेत. पण बोलायचं आम्ही आरक्षण दिल. कारण यांना बोलणारे कोण नाही. यांना विचारणारे कोणी नाही. सक्षम विरोधी पक्षाची गरज राज्याला आहे. भारत पेट्रोलियम एवढा मोठा उद्योग या सरकारने विकायला काढला आहे. आमचे बहुमत आहे आम्ही काही करू अशी त्यांची मानसिकता आहे. कुलाबा येथील बी पी टी ची जागा आहे. तिथे मेट्रो कारशेड करता आले असते. मात्र, ही जागा विकासकाला द्यायची आहे. न्यायालयाने पण कसा रात्री निर्णय दिला. सरकार आणि न्यायालयांचे संगनमत आहे. आज सर्वजण रेल्वेने प्रवास करतात.
रेल्वे प्रवाशांनी भरलेली असते. रेल्वेवर पैसे खर्च करायला नाही. 1 लाख कोटी मध्ये भारतातील रेल्वे खणखणीत होऊ शकते, असा अहवाल आहे. या सरकारला मात्र बुलेट ट्रेन आणायची आहे. रोज अहमदाबाद येथे जाणाऱ्या 75 ट्रेन रिकाम्या जातात. पण विचारणार कोण? कारण त्यांच्याकडे बहुमत आहे.
काँग्रेसचा विरोधी पक्ष नेताही त्यांच्याकडे गेला. भष्ट्राचाराचे आरोप असणारे सर्व नेते भाजपने स्वतःकडे घेतले. मी 2014 चा युतीचा जाहीरनामा आणला आहे. मात्र, यातील एकही गोष्ट पूर्ण झाली नाही. माझ्यावर आरोप होतात की मी आंदोलन अर्धवट सोडतो. एक आंदोलन दाखवा की मी अर्धवट सोडले. हे सरकार बोलले होते की टोलमुक्त राज्य करू, कुठे केलेय आहेत टोलमुक्त रस्ते दाखवा. यामुळेच सक्षम विरोधी पक्षाची यामुळेच या निवणुकीत भूमिका घेतली घेतली आहे. सेटलमेंट न करणारा विरोधी पक्ष मला द्यायचा आहे. अमित शहा 370 कलम काढून टाकले याबद्दल बोलत आहेत, त्यांचे अभिनंदन. मात्र, महाराष्ट्राचे काय? शेतकरी आत्महत्या करत आहेत, बँक डुबत आहे, त्याचे काय करणार आहेत.
या सरकारला कायमस्वरूपी सत्ता देत राहिलो तर काही होणार नाही. शिवसेना नेते राजीनामा घेऊन फिरत होते. याची चर्चा होत नाही. नोकरी मिळणार की नाही मिळणार, खड्डे बुझणार की नाही यावर कोण बोलायला तयार नाही, असे राज ठाकरे यांनी भांडुप येथील सभेत सांगितले.
घाटकोपर सभेत राम कदम याच्यावर राज यांचा निशाणा -
जिथपर्यंत राम कदम आमच्या पक्षात होता तिथपर्यत तो 'राम' होता. मात्र, भाजप प्रवेश केल्यानंतर त्याचा 'रावण' झाला आहे. दहीहंडीच्या वेळी कदम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची आठवण राज यांनी घाटकोपरच्या सभेत करुन दिली. इथला आमदार तुम्हाला सांगतो एखादी मुलगी आवडली तर सांगा मी तिला तुमच्यासाठी पळवून आणेन, असं म्हणणाऱ्याला या आमदाराला भाजपाने पुन्हा तिकिट दिले आहे. हा सत्तेचा माज नाहीतर काय? असा प्रश्नही राज यांनी यावेळी उपस्थित केला.