मुंबई- पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टी यांचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाही. राज कुंद्रा यांना 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी आहे. याच दरम्यान पोलीस राज कुंद्रा यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली आहे. राज कुंद्रा यांच्या कंपनीत काम करणारे चौघे आता साक्षीदार म्हणून समोर आले आहेत.
पोलिसांनी लॉकर केला जप्त
क्राईम ब्रांचमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे चारही साक्षीदार या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांच्याकडून मिळणारी माहिती या केसमध्ये प्रबळ पुरावा म्हणून समोर येईल. अटकेत असलेले राज कुंद्रा आणि त्याचे साथीदार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे कळत आहे. हे सर्व साक्षीदार महत्त्वाची माहिती आणि पुरावे पोलिसांसमोर सादर करणार असल्याची माहिती आहे. क्राईम ब्रांचची एक टीम शनिवारी दुसऱ्यांदा राज कुंद्रा यांच्या कार्यालयावर धाड टाकण्यासाठी गेली. आत्तापर्यंत क्राइम ब्रांच या टीमने दोन वेळा राज कुंद्रा यांच्या वियान या कार्यालयावर धाडी टाकल्या आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एक लॉकर या कार्यालयामध्ये लपवून ठेवला होता. लपवलेला लॉकर पोलिसांनी जप्त केला असून यात असणाऱ्या कागदपत्रांतून महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती आहे.