मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मात्र, अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये दोन आमदारांसह ४० पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
महाविकास आघाडी सरकारसमोर उन्हाळी अधिवेशनानंतर कोरोनाचे आव्हान उभे राहिले. तसेच नुकताच सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आला. या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. याचसोबत पदवी परीक्षा तसेच दुधाला भाव देण्याचे प्रश्नही ऐरणीवर असणार आहेत.
यंदा अधिवेशन विधानसभा अध्यक्षांविनाच पार पडणार आहे. मागील आठवड्यात विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पटोले यांना क्वारन्टाइन करण्यात आले आहे. सध्या उपाध्यक्ष नरहरी झरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडणार आहे.
मागील तीन महिन्यांपासून पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात दुधाला किमान भाव मिळण्यासाठी आंदोलन छेडले आहे. तसेच अतिरिक्त दुधाची भूकटी करण्यासंबंधी देखील सरकारने आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ते पूर्ण न झाल्याने विरोधकही या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधू शकतात. सध्या पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. यानंतर महाविकास आघाडी आणि केंद्रातील भाजपा सरकारमध्ये राजकारण सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यावरही विरोधकांनी गृह मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मुद्यावरही राजकारण तापल्याने त्याचे पडसाद विधानभवनात उठणार आहेत.