मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विनातिकीट आणि अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. अवघ्या एका महिन्यात 75 हजार फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले आहे.अशा प्रवाशांकडून मध्य रेल्वेने 3 कोटी 97 लाखांचा दंड वसूल केला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने जून 2020 ते मार्च 2021 पर्यंत उपनगरी लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये नियमित आणि सखोल तिकीट तपासणी मोहीम राबवली. या तपासणीदरम्यान 3 लाख 43 हजार फुकट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांंच्याकडून 12 कोटी 29 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापैकी सुमारे 2 कोटी 48 लाख प्रकरणे हे उपनगरी भागात आढळून आले आहेत. त्यांच्याकडून 6 कोटी 63 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये एकू 95 हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून 5 कोटी 62 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर मागील एक महिन्यामध्ये एकूण 75 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकूडन एकूण 3 कोटी 97 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन
उपनगरी गाड्यांमध्ये आणि बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोहिमेदरम्यान ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकिटावर प्रवास करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे हस्तांतरण करण्याची प्रकरणे अशा अनियमितता प्रामुख्याने लक्षात आल्या. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारची 250 कोटींची मदत