मुंबई - शिवसेनेतील काही गुंडांनी सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अदर पुनावाला यांना धमकावले. त्यामुळे अदर पुनावाला परदेशात निघून गेले, असे वक्तव्य एका खासगी वृत्तवाहिनीचे सूत्रसंचालक राहुल कंवल यांनी केले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसेनेकडून राहुल कंवल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी यासंदर्भात राहुल कंवल काम करत असलेल्या वृत्तसंस्थेला पत्र पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राहुल कंवल यांनी जाहीर माफी मागावी
राहुल कंवल यांनी तुमच्या वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान अदर पुनावाला यांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकावल्याचे म्हटले. ही गोष्ट धादांत खोटी आणि बदनामीकारक आहे. शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्याच्या कटाचा हा भाग वाटतो. कदाचित या माध्यमातून सध्या देशभरात सुरू असलेले कोरोनाचे थैमान आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल या विषयांवरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे राहुल कंवल यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या पत्रात केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण-
लंडनच्या 'द टाइम' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अदर पुनावाला यांनी म्हटले होते की, 'लस वाटपावरुन आपल्याला देशातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली व्यक्तींकडून धोका आहे.' 'सत्य बोलल्यास आपला शिरच्छेद केला जाईल,' अशी भीतीही पुनावाला यांनी व्यक्त केली होती. यांच्या वक्तव्यानंतर देशात मोठा गदारोळ झाला होता. त्यांना केंद्र सरकारने 'वाय' दर्जाची सुरक्षा देखील पुरवली आहे.