मुंबई - शिवसेनेतील काही गुंडांनी सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अदर पुनावाला यांना धमकावले. त्यामुळे अदर पुनावाला परदेशात निघून गेले, असे वक्तव्य एका खासगी वृत्तवाहिनीचे सूत्रसंचालक राहुल कंवल यांनी केले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसेनेकडून राहुल कंवल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. राहुल कंवल यांनी या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे
वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान मी सिरम इन्स्टिट्यूटला धमकावत असणाऱ्या नेत्याबद्दल बोललो. तो व्हीडिओ शिवसेनेच्या नव्हे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा होता. यामुळे झालेला गोंधळ आणि मनस्तापासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, असे राहुल कनवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
संपूर्ण प्रकरण-लंडनच्या 'द टाइम' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अदर पुनावाला यांनी म्हटले होते की, 'लस वाटपावरुन आपल्याला देशातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली व्यक्तींकडून धोका आहे.' 'सत्य बोलल्यास आपला शिरच्छेद केला जाईल,' अशी भीतीही पुनावाला यांनी व्यक्त केली होती. यांच्या वक्तव्यानंतर देशात मोठा गदारोळ झाला होता. त्यांना केंद्र सरकारने 'वाय' दर्जाची सुरक्षा देखील पुरवली आहे.