मुंबई - राज्य सरकारच्या महसूल विभागाने ई पीक पाहणी अहवाल शेतकऱ्यांसाठी आवश्यक केला आहे. याबाबतीत ग्रामीण स्तरावर तलाठी सर्व शेतकऱ्यांची जनजागृती करीत असून शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी अहवाल नोंदणी केली जात आहे. खरीप हंगामाची नोंदणी संपली असून आता रब्बी हंगामाची नोंदणी सुरू झाली आहे.
काय आहे ई पीक पाहणी नोंदणी?
शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर त्याच्या शेतात असलेल्या पिकाची नोंदणी केली जाते. मात्र कित्येकदा प्रत्यक्षात घेत असलेल्या पिकाची नोंदणी न होता वर्षानुवर्षे नोंद असलेल्या पिकाची माहिती पुढे येत राहते. त्यामुळे पीक लागवडीची अचूक माहिती उपलब्ध होणे शक्य नसते. म्हणूनच राज्य सरकारच्या महसूल विभागाने डिजिटल ई पीक पाहणी नोंदणी सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर डिजिटल पद्धतीने त्याच्या पिकाची नोंदणी केली जाते. शेतकऱ्याने संबंधित शेतात जाऊन तेथील पिकाचा फोटो या ॲपमध्ये अपलोड करायचा आहे. त्याचसोबत शेतात असलेल्या पिकाची लागवड दिनांक आणि हंगामाचा दिनांक यांची नोंद करणे आवश्यक आहे. तसेच पिक कोणत्या पाण्याच्या स्त्रोतावर काढले जाते आहे, याचीही नोंद करणे आवश्यक आहे.
ई पीक पाहणीचा काय फायदा?
ई पीक पाहणी मुळे राज्यात असलेल्या लागवड क्षेत्रात नेमके कोणते पीक आहे? याचा अंदाज येतो यामुळे पिकांचे उत्पादन झाल्यानंतर त्याच्या विपणनाची तयारी करता येते तसेच पिकांचा पॅटर्न ठरवण्यास मदत होते.
शेतकऱ्यांना प्रत्यक्ष होणारा फायदा?
यामुळे शेतकऱ्यांना पंतप्रधान विमा योजना तसेच डीबीटीचा लाभ घेताना कोणतीही अडचण येत नाही. डिजिटल सातबाऱ्यावर पिकाची नोंद असल्याने विमा कंपन्यांना वेगळी कागदपत्रे सादर करावी लागत नाहीत. तसेच शेतातील पिकांच्या आधारभूत किमती ठरवताना हा नोंदणी अहवाल महत्त्वाचा ठरतो. मुख्य म्हणजे अतिवृष्टी अथवा दुष्काळामुळे पिकाचे नुकसान झाल्यास कराव्या लागणाऱ्या पंचनाम्यांसाठी ई पीक पाहणी अहवाल अत्यंत उपयुक्त ठरतो.
आतापर्यंत झालेली नोंदणी?
राज्यातील ८७ लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई पीक पाहणी अहवालात नोंदणी केली आहे. यापैकी ६४ लाख शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे छायाचित्र काढून ॲपवर अपलोड केले आहेत. या प्रक्रियेमध्ये औरंगाबाद विभाग सर्वात पुढे आहे. त्यापाठोपाठ नाशिक आणि अमरावती विभागानेही आघाडी घेतली आहे, अशी माहिती ई पीक पाहणी राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.
हेही वाचा : गंगापूर तालुक्यात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; अनेक गावांचा संपर्क तुटला