मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे कामकाज थांबवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. यासोबतच एमएमआरडीएला आतापर्यंत झालेले काम जैसे थे ठेवण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात राजकारण करू नये, असे मत सर्वसामान्यांनी इटीव्ही भारताशी बोलताना दिले.
हेही वाचा - वॉर्नरला खेळायचाय 'बॉक्सिंग डे' कसोटी सामना
आरे जंगल नष्ट होऊ नये यासाठी मुंबई कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्यात आले. मात्र आता या जागेवरूनही आता वाद निर्माण झाला आहे. यामुळे पुन्हा मेट्रो कारशेडला विलंब होणारआहे. या निर्णयाबाबत स्थानिक प्रतिनिधी आणि नागरिकांना काय वाटते हे ईटीव्ही भारतने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
''ही जागा विकासकाला द्यायची आहे म्हणून हा घाट रचला जात आहे''
कांजूरमार्गमधील ही जागा कारशेडसाठी चांगली आहे. विरोधकांनी विरोधासाठी विरोध करू नये. आरेचे जंगल वाचावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मेट्रो कारशेडच्या समोरील बाजुतील जागा डम्पिंग ग्राऊंड म्हणजेच महानगरपालिकेला देण्यात आली आहे. मग या जागेवर विरोध का? ही जागा विकासकाला द्यायची आहे म्हणून हा घाट रचला जात आहे, असा आरोप स्थानिक नगरसेवक सुवर्णा करंजे यांनी केला आहे.
मेट्रोच्या कारशेडमध्ये राजकारण होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. जर राज्यसरकारने ही जागा निवडली आहे. मग केंद्र सरकारने याला विरोध न करता त्याला सहकार्य केले पाहिजे. न्यायालयाने काल स्थगिती दिल्यामुळे आता हे काम पुन्हा कधी सुरू होणार? असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे स्थानिक समाजसेवक डॉ योगेश भालेराव यांनी सांगितले.
हे कारशेड लवकर झाले पाहिजे. यामुळे वाहतूक कोंडी सुटणार आहे. आता काम थांबल्याने विलंब होणार असल्याचे स्थानिक रहिवाशी मकसूद खान यांनी सांगितले.