मुंबई - शिवसेना नेते ( Shiv Sena leader ) तथा माजी परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab ) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या ( BJP leader and former MP Kirit Somaiya ) यांनी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) अनिल परब यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. दापोलीमधील रिसॉर्टच्या बांधकामाविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच या प्रकरणात सीबीआय (CBI ) आणि ईडी ( ED ) तपासाची मागणी त्यांनी केली आहे. या याचिकेवर 22 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
विनापरवानगी दापोलीत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप - अनिल परब यांनी सागरी किनारा नियमांचे उल्लंघन करून आणि विनापरवानगी दापोलीत रिसॉर्ट बांधले आहे, असा आरोप सोमय्या यांनी यापूर्वी अनेकदा केला आहे. आता याबाबत त्यांनी थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून, नव्याने या तपासाची मागणी केली आहे. सीबीआय, ईडी किंवा अन्य तपास यंत्रणेमार्फत यावर चौकशी करावी संबंधित कथित अनधिकृत रिसॉर्ट जमीनदोस्त करावे आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.
ॲड. अखिलेश दुबे यांच्यामार्फत ही याचिका त्यांनी दाखल केली आहे. न्या. रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेचा उल्लेख करण्यात आला. न्यायालयाने यावर 22 जुलै रोजी सुनावणी निश्चित केली आहे.
सोमय्यांनी पोलीस महासंचालकांना अनिल परबांच्या अटकेची मागणी : साेमय्या म्हणाले की राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीने छापा मारला होता. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील रिसॉर्टच्या खरेदी- विक्रीत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी अनिल परब यांची चौकशी केली होती. ईडीच्या कारवाईनंतर या रिसॉर्टशी माझा संबंध नसून रिसॉर्टचे मालक मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम आहेत. ते रिसॉर्ट अजून सुरू झालेले नाही, असा दावा अनिल परब यांनी केला होता. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी आज पोलिस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर सोमय्या यांनी सदानंद कदम यांच्या पत्राचे वाचन प्रसारमाध्यमांसमोर केले. दापोलीतील रिसॉर्ट हे अनिल परब यांच्याच मालकीचे असल्याचा दावा त्यांनी केला.
पोलिसांकडे सादर केली महत्त्वाची कागदपत्रे : महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना आम्ही कागपत्रे दिली आहेत. अनिल परब म्हणत आहेत की, रिसॉर्ट सदानंद कदम यांच्या भागीदाराचा आहे. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान भाऊ आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे की, मी अर्जदार सदानंद कदम, रत्नागिरी, ग्रामपंचायत नमुना 8 या अभिलेखात नोंद होणेबाबत. वरील विषयाने आपणास कळवू इच्छितो की मी सदानंद कदम मौजे मुरुड येथील गट क्रमांक 446 व येथील मालमत्ता क्रमांक 1074 ही अनिल परब यांच्या नावे दाखल असून मी खरेदी केली आहे. ती माझ्या नावाने करावी ही विनंती.