मुंबई - राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांची अपर मुख्य सचिव पदावर पदोन्नती करण्यात आली. मागील पाच वर्षांपासून ते आरोग्य विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहत आहेत.
वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डॉ. व्यास हे भारतीय प्रशासन सेवेच्या १९८९ तुकडीचे अधिकारी आहेत. जयपूर येथे एमबीबीएस आणि त्यानंतर एमडी पेडियाट्रिक हे शिक्षण पूर्ण केले. राज्यात कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून त्यांचे वैद्यकीय ज्ञान आणि अनुभव त्यासाठी कामी येत आहे. सेवेच्या सुरूवातीचे आठ वर्ष त्यांनी तामिळनाडूच्या उद्योग आणि वित्त विभागात सेवा बजावली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांनी कृषी क्षेत्राशी निगडीत राज्य बियाणे महामंडळ आणि कृषी औद्योगिक विकास महामंडळात आठ वर्ष सेवा केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी, राज्याचे वित्त सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. जुलै २०१७पासून डॉ. व्यास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत.