मुंबई - गेल्या ७२ वर्षांत सर्वांच्या सुख-दु:खात साथ देणारी, ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा कणा असणारी, ग्रामीण भागाची लाडकी लालपरी अर्थात एसटी गेल्या दोन महिन्यापासून आगारात उभी असल्याने नागरिकांची मोठी गैससोय होत ( ST Workers Strike ) आहे. यामुळे शहरी-ग्रामीण भागातील नागरिकांनी आता खासगी बसेसची वाट धरली असून, दररोज लाखो प्रवासी खासगी बसेसमधून प्रवास करत ( Private Transporters Benefiting From ST Strike ) आहेत. सध्या राज्यात नऊ हजार खासगी प्रवासी वाहनांमधून प्रवास करत असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
नऊ हजार खासगी वाहन
गेल्या दीड वर्षांनंतर एसटी बसेसचे चाक रुळावर येत असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. एसटीला शासनात विलीनीकरण ( MSRTC Merger With Government ) या प्रमुख मागणीवरून गेल्या दोन महिन्यापासून बेकायदेशीर संपावर एसटी कर्मचारी गेले आहे. आतापर्यत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यात शासनाला अपयश आले आहे. परिणामी एसटीचा संप सुरूच असल्याने सर्वसामान्य नागरिकांबरोबर आणि एसटी महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नयेत, म्हणून खासगी प्रवासी वाहनांसह बस वाहतुकदारांना टप्पा वाहतुकीची परवानगी परिवहन विभागाने दिलेली आहे. त्यामुळे आज सरासरी दररोज राज्यभरात ९ हजार खासगी प्रवासी वाहने धावत आहे. या खासगी वाहतूकदारांमध्ये खासगी प्रवासी बसेससह स्कूल बसेस आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
अशा आहे आकडेवारी
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत विभागात ३९१, ठाणे विभागात २५९,पनवेल विभागात ४७८, कोल्हापूर विभागातून ५३१, पुणे विभागातून १२९४, नाशिक विभागातून ७६५,धुळे विभागातून ६९२, औरंगाबाद विभागातून ८, नांदेळ विभागातून १८४, लातूर विभागातून ६१७, अमरावती विभागातून १८५५, नागपूर विभागातून ७१३ आणि भंडारा विभागातून ३३२ अशा राज्यभारतून ८ हजार ११९ खासगी वाहने धावत आहे. ज्यामध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी दोन ते अडीच हजार खासगी बसेस आणि छोट्या व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी २०० ते ४०० स्कूल बसेस धावताना दिसत आहेत.
कमी पैशांमध्ये दर्जेदार सेवा
एसटीचा संपाचा फायदा उचलत मोठ्या प्रमाणात खासगी वाहतुकदारांकडून राज्याभरातून प्रवाशांची वाहतूकल करत आहे. यामध्ये काही वाहतूकदार प्रवाशांना कमी पैशांमध्ये दर्जेदार सेवा देत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर खासगी वाहतुकदार आकारत आहेत. तर काही ठिकाणी तिकिटांचे दर ३० ते ५० रुपये कमी आकारत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे एसटीचे प्रवासी कायमस्वरुपी दुरावण्याची भीती महामंडळाकडून व्यक्त केली जात आहे.
सणासुदीत प्रवाशांना मोठा प्रतिसाद
परिवहन विभागाने एसटी संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल रोखण्यासाठी खासगी प्रवासी वाहनांसह बस वाहतुकदारांना टप्पा वाहतुकीची परवानगी दिलेली आहे. मात्र, आज दोन महिने होऊन सुद्धा एसटी कामगार संपावर ठाम असल्याने प्रवाशांना खासगी वाहनातून प्रवास करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सामान्य दिवसात राज्यभरात साडे आठ ते नऊ हजार खासगी प्रवासी वाहन दररोज धावत आहे. मात्र, सणासुदीच्या काळात धावणाऱ्या खासगी प्रवासी वाहनांचा आकडा १० हजारांच्या घरात जात असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.