मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून कोकणातील पूर परीस्थितीची माहीती घेतली. तसेच, केंद्र सरकारकडून सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे. ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
'केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल'
राज्यातील पूर परिस्थिती संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे, त्याचप्रमाणे कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत, त्याची माहिती दिली. बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
'काही तासांतच होत्याचे नव्हते झाले'
बुधवारी रात्रीपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये काही तासांतच होत्याचे नव्हते झाले अशी परिस्थिती आहे. वशिष्ठी, शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे. त्यानंतर हळूहळू चिपळूण शहरात पूर्णपणे पाणी भरले. तर, दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने कहर केला आहे. पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तूकड्याही उतरल्या असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील अद्ययावत माहिती घेत आहेत.
'सैन्य दलाच्या तुकड्या तैनात'
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्हयांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हयांमधील अनेक नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने, एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.