मुंबई - हवामान विभागाने मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यानुसार गुरुवार ते रविवार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार बुधवारी मुंबईची तुंबई झाली होती. काल पावसाने थोडी विश्रांती घेतली. त्यानंतर आज सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने हिंदमाता, सायन, किंग सर्कल आदी सखल भागात पाणी साचले आहे. आज दिवसभरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
इतका पडला पाऊस
मुंबईत रात्री 8 ते सकाळी 8 या 12 तासात शहर विभागात 47.69 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात 67.35 मिमी तर पूर्व उपनगरात 69.48 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. सकाळी 6 ते सकाळी 7 वाजेपर्यंत, या एका तासात मुंबई शहर विभागात माटुंगा एफ नॉर्थ 29 मिमी, रावळी कॅम्प 25 मिमी, दादर फायर स्टेशन 28 मिमी, धारावी फायर स्टेशन 19 मिमी, एल्फिस्टन जी साऊथ ऑफिस 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पूर्व उपनगरात विक्रोळी फायर स्टेशन 33 मिमी, घाटकोपर एन वॉर्ड येथे 32 मिमी, कुर्ला एल वॉर्ड येथे 23 मिमी, विक्रोळी येथे 21 मिमी, कुर्ला फायर स्टेशन 19 मिमी, भांडुप एस वॉर्ड 18 मिमी, चेंबूर फायर स्टेशन 15 मिमी, चेंबूर एम वेस्ट कार्यालय 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी फायर स्टेशन येथे 16 मिमी, अंधेरी के वेस्ट कार्यालय 15 मिमी, बांद्रा फायर स्टेशन 14 मिमी, कूपर हॉस्पिटल 10 मिमी, मरोल फायर स्टेशन येथे 09 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाने बुधवारी रेड अलर्ट दिला होता. त्यादिवशी मुंबईची तुंबई झाली होती. गुरुवार ते रविवार या चार दिवसात ऑरेंज अलर्ट दिला आहे. या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्रात आज दुपारी 12.54 वाजता 4.32 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. यावेळी पाऊस पडल्यास शहरात पाणी साचल्याने मुंबईची पुन्हा तुंबई होऊ शकते.
हेही वाचा - अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टरस्केलवर 3.6 तीव्रतेची नोंद