मुंबई - विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होत आहे. विशेष म्हणजे या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याकारणाने ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार आहे. त्यातच मागील १० जून रोजी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला भाजपाने त्यांचा तिसरा उमेदवार निवडून आणून मोठा झटका दिल्याकारणाने या निवडणुकीची ( Legislative Council elections 2022 ) उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २८८ आमदारांपैकी २८५ आमदार उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात भाजपाच्या पुण्याच्या कसबा पेठ येथील आमदार मुक्ता टिळक व पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांची तब्येत खालावली असल्याकारणाने ते उद्या मतदानाला हजर होतील का? याबाबत सुद्धा अजून नक्की नाही आहे. परंतु पक्षाशी एकनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष असल्याकारणाने राज्यसभेच्या निवडणुकीत यांनी मतदानाचा अधिकार बजावला होता हे विशेष. तसेच उद्या होणाऱ्या निवडणुकीत लहान पक्ष व अपक्ष आमदार यांची १५ मत आहेत व ही १५ मत अतिशय निर्णायक ठरणार आहेत. या मतांसाठी सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कितीही विनवण्या, विनंत्या व गाठीभेटी घेतल्या तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत ही मते कोणाला भेटणार हे गुलदस्त्यातच राहणार आहे.
प्रसाद लाड व भाई जगताप यांच्यात खरी चुरस? : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्त्वाच आहे. अपक्ष आमदार, छोटे पक्ष यांची जवळपास १५ मते आहेत. विधान परिषद निवडणुकीतील ही सगळीच्या सगळी मत भाजपाला मिळणे शक्य नाही. मात्र त्यातील बहुतांश मते मिळविण्यासाठी भाजपा जोरदार प्रयत्न करत आहे. यामध्ये वाद नाही. निवडून येण्यासाठी मतांचा कोटा जरी २६ असला तरीसुद्धा भाजपाची एकंदरीत मत बघता भाजपा आमदारांची संख्या १०६ असून त्यांना ४ उमेदवारांसाठी १०४ मतांची आवशक्यता आहे. तसेच ८ अपक्षांचा पाठिंबा त्यांना आहे. पण त्यातही काही फुटू शकतातही. त्यासाठी भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी जवळपास २० मत हवी आहेत. त्यामुळे त्यांना या मतांसाठी बेगमी करावी लागणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना ९ ते २२ मतांची बेगमी करावी लागणार आहे. संख्याबळानुसार बघितले तर काँग्रेस आमदारांची संख्या ४४ असून त्यांना पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना २६ मते दिल्यास त्यांच्याकडे १८ मत उरतात अशात काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना जिंकून येण्यासाठी ८ ते १० मतांची बेगमी करावी लागणार आहे.
अपक्ष व छोट्या पक्षांचे तळ्यात-मळ्यात? : मागील काही दिवसांपासून अपक्ष व छोट्या पक्षांची मनधरणी करण्यासाठी बरेच प्रयत्न सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून, त्याचबरोबर उमेदवारांकडून होताना दिसत आहेत. मागील राज्यसभा निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीची ३ मत फार निर्णायक ठरली होती. यावेळी ती मत आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडी तसेच भाजपाकडूनही मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न होताना दिसत आहेत. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर, भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड, त्याचबरोबर प्रवीण दरेकर यांनी सुद्धा हितेंद्र ठाकूर यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली आहे. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी कुणालाही शब्द दिला नसून ते कोणाला मत देणार हे शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहणार आहे. आता प्रश्न असा येतो की हे गुप्त मतदान असल्याकारणाने तुम्ही जरी कितीही प्रयत्न केला व समोरच्याने तुम्हाला कितीही आश्वासन दिली. तरी त्यांचे मत हे तुम्हाला येईल किंवा कुठल्याही इतर पक्षाला जाईल हे सांगणे फार कठीण आहे. म्हणूनच शेवटी आत्ताच्या घडीला पूर्वापार चालत आलेली पक्षावर असलेली एकनिष्ठता, विश्वासहर्ता कुठेतरी लोप पावत चालली असल्याची शंका निर्माण होत आहे.
मुख्यमंत्र्यांसहित काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला? : महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षातील असंतुष्ट आमदारांना खूश करण्याचे विविध मार्ग भाजपाकडे असल्याने त्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे गुप्त मतदान असल्यामुळे भाजपचे सगळीच्या सगळी मतं त्यांना पडतील याची शाश्वती नाही. त्या कारणास्तव चारही बाजूला उलटसुलट मतं फुटण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभा निवडणुकीत चमत्कार करणाऱ्या देवेंद्र फडवणीस यांच्यासाठी सुद्धा हे एक मोठं आव्हान आहे. जर यामध्ये ते ते सफल झाले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसाठी ही मोठी नामुष्की ठरणार असून, येणाऱ्या काळात महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणामध्ये समोर येऊन याचा फायदा भाजप घेणार यात तिळमात्रही शंका नाही.
हेही वाचा - Vidhan Parishad Election 2022 : 'भाजप वीस मते कुठून आणणार?, चोऱ्या माऱ्या...'; संजय राऊतांचे टीकास्त्र