मुंबई - म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची (Mhada Exam Postpond) माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Video On Mhada Exam) यांनी रात्री उशिरा ट्विटरद्वारे विद्यार्थ्यांना दिली. या माहितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला असून वर्षभरापासून तयारी केलेले विद्यार्थी अचानक या निर्णयाने दुःखी झाले आहेत. परंतु विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ट्वीट सुद्धा जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Tweet) यांनी केले आहे. अगोदर एमपीएससी परीक्षा घोटाळा (MPSC Exam Scam) , त्यानंतर आरोग्य सेवा पदभरती घोटाळा (Helth Department Exam Scam) व आता म्हाडाच्या परीक्षा पुढे (Mhada Exam Postpond) ढकलल्याने त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड -
काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडा आणि इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारी महिन्यात होणार आहेत. ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे. त्याबद्दल मी क्षमा मागतो. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षा देण्यासाठी सेंटरवर जाऊ नये, गाव सोडू नये, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती त्यांनी दिली आहे. आज म्हाडामधील नोकर भरतीसाठी परीक्षा होणार होती. यापूर्वी आरोग्य विभागातील भरतीकरिता परीक्षा झाल्या आणि पेपर फुटीचे प्रकरण बाहेर पडले. यावरून वादंग सुरू असताना म्हाडा भरतीमध्ये आर्थिक व्यवहार झाले असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कानावर आल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत आव्हाड यांनी दोषींना सोडले जाणार नाही, असा सज्जड दम दिला आहे. त्यानंतर आता म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
'विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळखंडोबा सुरू आहे' -
परिक्षांच्या बाबतीत सातत्याने गोंधळाचे वातावरण सरकार निर्माण करत असून एमपीएससी असो, आरोग्य सेवा पदभरती असो, त्याचबरोबर म्हाडाच्या परीक्षा या सर्वांबाबत सरकार जाणूनबुजून संभ्रम निर्माण करत आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. या सर्व प्रकारांमध्ये युवकांचे विशेषकरून विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असून सरकार त्याकडे गांभीर्याने बघायला तयार नाही असंही प्रवीण दरेकर यांनी सांगितल आहे. या संपूर्ण मुद्द्यांवर वारंवार बोलून सुद्धा सरकारवर त्याचा काहीच फरक पडत नाही, उलटपक्षी असे प्रकार दिवसेंदिवस अधिक वाढत आहेत व विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावण्याचे काम सुद्धा सरकार करत आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा जो खेळखंडोबा चालला आहे, त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
'दलालांनी विद्यार्थ्यांचे पैसे परत करावे' -
माझी या दलालांना नम्र विनंती आहे की हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांच काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे, असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत. गरीबाचे शाप घेऊ नका, कृपया म्हाडाची नोकरी लावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेत त्यांनी उद्या रात्रीपर्यंत ते पैसे परत करावेत. कारण तुमच्या पैशाने हे काम होईल, हा जरी तुम्हाला कोणी विश्वास दिला असेल तर ते कदापि शक्य नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दलाली करणाऱ्यांना दिला आहे.