मुंबई - विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. मात्र दुसरा दिवस गाजला तो विरोधकांच्या आंदोलनाने. ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्यानंतर इंपेरिकल डाटा केंद्र सरकारने राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा, असा ठराव ठाकरे सरकारने विधानसभेत मांडला होता. त्यानंतर विरोधीपक्षांच्या आमदारांनी गोंधळ घातला. त्यानंतर भाजपाच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच कारवाईचे दुसऱ्या दिवशी देखील पडसाद पहायला मिळाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवरच विरोधकांनी ठिय्या मांडला. विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारच्याविरोधात घोषणा देखील दिल्या गेल्या. तसेच सरकारच्याविरोधात विधानभवनाच्या बाहेर प्रतिसभागृह भरवून भाजपने आनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.
सोनिया गांधींविरोधात घोषणाबाजी -
12 आमदारांचे निलंबन झाल्याने विरोधकांची आक्रमक भूमिका आज विधानसभेच्या पाऱ्यांवर दिसून आली. यावेळी सत्ताधारी पक्षांचे आमदार आणि मंत्र्यांचा सभागृहात प्रवेश होताच विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील केली जात होती. विधानभवन परिसरात असलेल्या मीडिया स्टॅण्ड समोरच विरोधकांनी प्रतिसभेचे आयोजन केले होते. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले फोन टॅपिंगचा मुद्दा मांडण्यासाठी पत्रकारांकडे आले होते. यावेळी त्यांना रोखण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. मात्र पटोले इलेट्रॉनिक मीडियाला बाईट देत होते. तेव्हा विरोधकांनी जोरदार घोषणा दिल्या. नाना पाटोले दिसताच सोनिया गांधींविरोधात घोषणा देण्यात आल्या.
भाजपाचे प्रतिसभागृह -
विधानसभेत 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजपने आज विधीमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार करत विधानसभेच्या पायऱ्यावरच आंदोलनाचे अस्त्र उपसले. इतकेच काय तर विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून प्रतिसभागृह देखील भरवले होते. या प्रतिसभागृहाचे अध्यक्षस्थान कालिदास कोळंबर यांना देण्यात आले होते.