मुंबई - मनी लॉन्डरिंग संदर्भात सक्तवसुली संचलनालयामार्फत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले होते. यानंतर त्यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अद्याप प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक हे ईडीसमोर हजर झाले नाही.
सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक याने पत्नी आजारी असल्यामुळे काही दिवसांचा वेळ मागितल्याचे 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. विहंग सरनाईक याने ईडीच्या कार्यालयाला पाठवलेल्या पत्रानुसार त्याची पत्नी आजारी असून तब्येतीत सुधारणा झाल्यानंतरच चौकशीसाठी हजर होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सरनाईक 'नॉट रिचेबल'
तर दुसरीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सलग तिसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप नोटिशीला कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यात आले नाही. दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक सध्या कुठे आहेत, हे देखील अधिकाऱ्यांना माहिती नसल्याचं समोर आलंय. प्रताप सरनाईक यांच्या लीगल टीमसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, सरनाईक सध्या चौकशीसाठी हजर होणार नसल्याचे त्यांच्या लीगल टीमरतर्फे सांगण्यात आले आहे.
विहंग सरनाईक ईडी प्रकरण
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुंबई व ठाण्यातील घरावर 'ईडी'च्या पथकाने छापेमारी केल्यानंतर या संदर्भात सरनाईक यांचा मुलगा विहंग यास तब्बल 5 तास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर विहंग सरनाईक यास सोडण्यात आले. मात्र यानंतरही पुन्हा एकदा चौकशी करण्यासाठी दोन वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. मात्र तो अद्याप चौकशीसाठी हजर झाला नसल्याचे सूत्रांकडून कळत आहे. यामुळे सक्तवसुली संचलनालयातर्फे तिसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आले आहे.