मुंबई - प्रकाश मेहता म्हणजेच घाटकोपर पूर्व अशी ओळख मतदारसंघात झाली होती. मात्र, 2019 हे वर्ष मेहतांना अडचणीचे ठरले. महाराष्ट्र भाजपमधले ताकदवान नेते असलेले मेहता हे मुख्यमंत्री यांच्या नावडत्या यादीमध्ये आले आणि बघता बघता त्यांचे मंत्रीपद गेले आणि त्यानंतर आमदारकीची आशाही. त्यांना डावलत नगरसेवक पराग शहा यांना उमेदवारी दिली गेली. यानंतर मेहता समर्थकांनी राडा घालत शहा यांची गाडी फोडली. मेहता यांना तिकीट नाकारल्यामुळे भाजपला या मतदारसंघात आघाडीच्या मनीषा सूर्यवंशी, मनसेचे सतीश पवार, वंचित बहुजन आघाडीचे विकास पवार यांचे मोठे भाजपसमोर आव्हान उभे राहिले आहे.
हेही वाचा - 'या' मंत्र्यांना निवडणूक जाणार अवघड? तर, काही नेतेही अडचणीत?
मेहता यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे विरोधी पक्षांच्या जिंकण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पराग शहा यांच्या प्रचारात मेहता समर्थक दिसत नसले तरी, असे काही नाही की सर्व काही आलबेल आहे, असे शहा यांच्याकडून सांगण्यात येत आहे. 2009 चा विचार केला तर 6 हजार 242 मतांनी मेहता यांनी कॉंग्रेसच्या वीरेंद्र बक्षी यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये मात्र मोदी लाटेवर मेहता यांनी 40 हजारांच्या फरकाने विजय प्राप्त केला होता. यावेळी आपण विजयी होऊ या आशेत असलेल्या मेहता यांचे तिकीट कापण्यात आले.
दरम्यान, मेहता यांनी जरी सांगितले असले की मी पक्षाबरोबर आहे तरी, त्यांची नाराजी मात्र लपलेली नाही. गुजराती एकगठ्ठा मतांमुळे मेहता हे विजयाला गवसणी घालत होते. मेहता यांना मानणारा एक मोठा घटक या मतदारसंघात आहे. जर, या मतदारांनी नाराजी मतातून व्यक्त केली तर या मतदारसंघातील समीकरणे बदलू शकतात. या मतदारसंघात अनेक समस्या प्रलंबित आहेत. वाहतूक कोंडी, पुनर्विकास, एसआरए प्रकल्प या मतदारसंघातील मुख्य समस्या आहेत. गुजराती, मराठी, मुस्लीम, उत्तर भारतीय असा हा संमिश्र मतदारसंघ आहे. पराग शहा हे नाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून गाजले होते. स्वतःची प्रचार यंत्रणा आणि कमळावर असलेला लोकांचा विश्वास, मोदींचे नाव या गोष्टीवर शहा निवडणूक लढवत आहेत. मात्र, 2019 ची निवडणूक ही शहा यांच्यासाठी सोपी नसणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, पीएमसी बँकसुद्धा असणार आहे. कारण या भागात असलेले अनेक गुजराती व्यावसायिकांचे लाखो रुपये या बँकेत अडकले आहेत. सरकारने या बँकेबाबत घेतलेल्या भूमिकेने हे बांधव नाराज आहेत. त्यात काँग्रेसने हा मुद्दा पहिल्या दिवसापासून लावून धरला आहे. याचा फायदा विरोधी पक्षाला होऊ शकतो. मात्र, भाजपला या मतदारसंघात हरवण्यासाठी विरोधी पक्षांना अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.
हेही वाचा - 'मिशन व्हिक्टरी'साठी आमदार प्रणितींचा झंझावात प्रचार
गेल्या अनेक वर्षांपासून अनेक समस्या या मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात प्रमुख प्रश्न तसेच आहेत. नगरसेवक पराग शहा यांना तिकीट दिल्यामुळे आमचा विजय सोपा झाला आहे, असे काँग्रेसचे उमेदवार मनीषा सूर्यवंशी यांनी सांगितले.
आम्ही विकासाच्या मुद्यांवर निवडणूक लढवत आहोत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पुनर्विकास रखडलेला आहे. लोकांना भेटून आम्ही आमची भूमिका आणि पाच वर्षात काय करणार हे समजावून सांगत आहोत. प्रत्येक भागाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. बिल्डर लॉबी घाटकोपर गिळायला निघाली आहे आणि भाजपने आता जे उमेदवार दिले आहेत तेही विकासक आहेत, असे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विकास पवार यांनी सांगितले.
घाटकोपर पूर्वमध्ये वेगवेगळ्या विभागात समस्या ही वेगळ्या आहेत. झोपडपट्टी विभाग ही मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात आहे. या सर्व समस्यांचा अभ्यास करून ते सोडणार आहे. तसेच या मतदारसंघातील लोकांचे प्रेम ही माझ्या बाजूने आहे. त्यामुळे मीच विजयी होणार आहे, असे भाजपचे उमेदवार पराग शहा यांनी सांगितले.