मुंबई - लोकसभा निवडणुकीत मतदान आणि त्यानंतर झालेल्या मतमोजणीत प्रचंड मोठी तफावत समोर आली आहे. कुठे जास्त तर कुठे कमी, असा फरक समोर आला आहे. याविषयी निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
मुंबईतील बेलोर्ड पियर येथे असलेल्या त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगाला लक्ष करत त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, राज्यातल्या सर्व ४८ मतदारसंघांमध्ये झालेले एकूण मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी केलेले मतदान यांमध्ये तफावत आढळून येत आहे. याचा अर्थ असा आहे, की २४ मतदारसंघांमध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या ही मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा कमी आहे आणि उर्वरित २४ मतदारसंघांमध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या ही मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा जास्त आहे. एक-दोन ठिकाणांचे मोजके अपवाद वगळता यापूर्वी कोणत्याही निवडणुकीमध्ये, अशा प्रकारची तफावत आढळली नाही. म्हणूनच आम्ही निवडणूक आयोगाला आवाहन करतो, की त्यांनी या तफावतीचे १५ दिवसाच्या आत स्पष्टीकरण द्यावे. यासाठी आम्ही आयोगाला पुराव्यासाठी सोबत, वेबसाईटवरील निकालाचे स्क्रिनशॉट दिले आहेत. यामुळे आयोगाने याचे स्पष्टीकरण न दिल्यास, वंचित बहुजन आघाडी याविरोधात रस्त्यावर उतरून लढा सुरू करेल, असे ही आंबेडकर म्हणाले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगापुढे अर्ज केला होता, की ईव्हीएमबरोबर पेपर ट्रेल व्हीव्हीपॅटदेखील मोजले पाहिजे. मात्र निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांच्या अर्जाला नाकारले. त्यानंतर राजकीय पक्षांनी या विषयासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तेव्हा सुप्रीम कोर्टाने प्रत्येक मतदारसंघातून ५ बूथमधील व्हीव्हीपॅटची मोजणी पुरेशी असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय कितपत योग्य होता, हे भविष्यात स्पष्ट होईलच, असेही आंबेडकर म्हणाले.
देशातील सर्व राजकीय पक्षानी त्यांच्या राज्यांमध्ये मतदान मोजणीसंदर्भांत तपासणी करावी. या तपासणीत त्यांना कोणत्याही प्रकारची तफावत आढळून आल्यास, त्यांनी सर्वप्रथम यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करावी. कारण निवडणूक प्रक्रियेत बेकायदेशीर मार्गांचा अवलंब झालेला असेल तर न्यायालयाला त्या निवडणुका रद्द करण्याचा अधिकार आहे. यासाठी लोक प्रतिनिधी कायद्याचादेखील आधार घेता येईल, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.