मुंबई - मुंबईमध्ये बुधवारपासून पाऊस पडत आहे. यामुळे मुंबईमधील पवई तलाव आज दुपारपासून भरून वाहू लागला आहे. महापालिका क्षेत्रातील हा कृत्रिम तलाव आहे. मागील वर्षी हा तलाव ५ जुलैला भरून वाहू लागला होता. यावर्षी एक महिना आधीच हा तलाव भरला आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पवई तलाव हा कृत्रिम तलाव आहे. या तलावाचे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने, औद्योगिक कामासाठी वापरले जाते. मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पाऊस सुरूच असल्याने आज दुपारी 3 वाजल्यापासून हा तलाव फुल्ल भरून वाहू लागला आहे. 545 कोटी लीटर इतकी या तलावाची साठवण क्षमता आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे १२.५९ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ चौरस किलोमीटर आहे. या तलावाची पूर्ण भरून वाहण्याची पातळी ही १९५ फूट आहे.
मुंबईकरांचा पिकनिक स्पॉट
पवई तलाव हा मुंबईच्या मध्यभागी असल्याने मुंबईकरांसाठी हा हक्काचा पिकनिक स्पॉट आहे. दरवर्षी मुंबईकर या ठिकाणी पावसाची मजा घेण्यासाठी येतात. गेल्यावर्षीपासून कोरोना प्रसाराच्या भीतीने याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी कमी झाली आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात मगरींचे वास्तव्य आहे.
हेही वाचा - दरवाढीचा भडका! पेट्रोलबरोबर डिझेलने या शहरात ओलांडला शतकाचा उंबरठा