मुंबई – कोरोनाच्या संकटात पोस्ट आणि रेल्वे विभागाने ग्राहकांच्या घरापर्यंत पार्सल बुकिंग व वितरणाची खास सेवा सुरू केली आहे. ही योजना लवकरच सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि अकोला येथे उपलब्ध होणार आहे.
राज्यात सर्वप्रथम मध्य रेल्वे आणि राज्याचे पोस्टल सर्कल यांनी संयुक्तपणे मुंबई ते पुणे टपाल रेल्वे पार्सल सेवा सुरू केली. त्यानंतर नागपूरमधून भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा करण्यात आली.
कोरोनाच्या संकटात नागरिकांना, व्यावसायिकांना व उद्योगांना मोठ्या आकाराच्या आवश्यक आणि इतर वस्तूंची वाहतूक करणे कठीण जात आहे. बऱ्याच नागरिकांकडून पार्सल पाठविण्यासाठी स्पीड पोस्टची सेवा मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. मात्र, ग्राहकांना जास्त वजनाच्या स्लॅबमध्ये असलेल्या वस्तू बुकिंगसाठी पोस्ट कार्यालयात नेणे अवघड जात आहे.
मध्य रेल्वेमार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष पार्सल गाड्यांचा विचार करून, मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कलने टपाल सेवा सुरू केली आहे. यामध्ये रेल्वेच्या क्षमता विचार करण्यात आला आहे. भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा 15 मे पासून मुंबई, पुणे आणि नागपूर स्थानकांमधून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सेवेमध्ये ग्राहकांच्या घरापासून वस्तू घेण्यात येतात. मध्य रेल्वेद्वारा चालविल्या जाणार्या विशेष पार्सल गाड्या व पोस्टल मेल मोटर सर्व्हिसद्वारे वस्तू इच्छित ठिकाणी पोहोचविण्यात येतात. ही सेवा ग्राहकांना किफायतशीर दराने आणि घराच्या दारापर्यंत देण्यात येते.