मुंबई - बालवयातच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी राज्यात शालेय शिक्षण विभागामध्ये संगीत, हस्तकला, चित्रकला शिक्षकांची पदे भरली जात होती. परंतु, राज्यात मागील काही वर्षात राबवण्यात येत असलेल्या अनेक धोरणांमुळे ही पद्धत आता कायमची हद्दपार होण्याच्या मार्गावर आली आहे. यासाठी नुकतेच सरकारने खाजगी शाळेतील कर्मचारी सेवा संस्थेच्या नियमावली 1981 मधील आणखी काही सुधारणा करण्यासाठी एक मसुदा प्रस्तावित केला आहे.
प्रस्तावित मसुद्यात चित्रकला आणि हस्तकला शिक्षकांची पदेच वगळली असल्याने येत्या काळात राज्यातील शालेय शिक्षणातून ही पदे कायमची हद्दपार होण्याची भीती निर्माण झाली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे प्रमुख सुधीर घागस यांनी सरकारला या सुधारणेच्या मसुद्यात बदल करावा, तसेच राज्यातील शाळांमध्ये चित्रकला आणि हस्तकला शिक्षक यांची पदे कामय राहतील अशा स्वरूपाची तरतूद करावी, अशी मागणी या मसुद्यावर दिलेल्या हरकतीत केली आहे.
हेही वाचा - 'मोदी-शाह पाकिस्तानच्या सांगण्यावरून भारतातील हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत का?'
खासगी शाळांतील कर्मचारी सेवा संस्थेच्या नियमावली 1981 मधील आणखी काही सुधारणा करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी मसुदा प्रस्तावित केला होता. त्यावर हरकती मागवण्याची मुदत नुकतीच संपली आहे. या सुधारणा मसुद्यात प्रामुख्याने अनुसूची 'ब' मधील शिक्षकांच्या अहर्ताबाबत आहेत. या दोन्ही बाबींमध्ये 'विशेष शिक्षक' म्हणून चित्रकला शिक्षक व हस्तकला शिक्षक यांचा समावेश आहे. त्यांच्या काही अर्हता निश्चित केलेल्या आहेत. मात्र, प्रस्तावीत नमुन्यातील एक बाब प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता परिशिष्ट दोन या शीर्षकाखाली उच्च प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता या दोन परिषदांमध्ये चित्रकला शिक्षक आणि हस्तकला शिक्षक यांचा समावेश होता. हा प्रस्ताव सुधारणांमध्ये वगळण्यात आला आहे. दरम्यान, यावर शिक्षण क्रांती संघटनेचे प्रमुख सुधीर घागस यांनी आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा - गीता गोपीनाथ यांनी मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता दिला 'हा' सल्ला
राज्यात यापूर्वी उच्च माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर यामध्ये चित्रकला शिक्षक आणि हस्तकला शिक्षक यांचा समावेश होता. आता प्रस्तावित सुधारणेमध्ये चित्रकला आणि हस्तकला शिक्षकांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी अपेक्षा बाळगायची आणि दुसरीकडे मात्र अशाप्रकारे चित्रकला, हस्तकला या शिक्षकांची पदे वगळून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यायचा नाही, हे धोरण चुकीचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासाठी आम्ही शिक्षण क्रांती संघटनेकडून हरकत नोंदविली असून ही हरकत आम्ही मुदतीत नोंदवलेले असले तरी त्यानंतर आम्ही काही सूचना देखील सुचवलेल्या आहेत. चित्रकला शिक्षकांसोबतच आम्ही संगीत शिक्षक आदी शिक्षकांचीही मागणी या नवीन सुधारणेमध्ये केली आहे. तसेच त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने याचा गांभीर्याने विचार करावा आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना न्याय मिळेल अशी सुधारणा या नवीन धोरणात करावी, अशी मागणीही करण्यात आली असल्याची माहिती घागस यांनी दिली.
हेही वाचा - राज्य सरकार ५० दिवस तरी टिकणार का? रामदास आठवलेंचा उपरोधिक प्रश्न