मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि अपक्ष उमेदवार संभाजीराजेंमध्ये लढत होणार आहे. शिवसेनेकडे दुसऱ्या जागेसाठी पुरेसे संख्याबळ आहे. तर संभाजीराजेंना ४२ मतांचा ( Sambhaji Raje Chhatrapati ) आकडा गाठण्यासाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे. संभाजीराजे आणि मराठा संघटनांकडून ( Maratha organization ) रणनीती आखली जात असून सर्वच राजकीय पक्षातील मराठा समाजाच्या आमदारांना गळ घालण्यात येत आहे. मात्र, पक्षादेश टाळून आमदार ( Maratha MLA vote To Sambhaji Raje ) संभाजीराजेंना मदत करतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रपती पुरस्कृत खासदार म्हणून भाजपाकडून संभाजीराजे राज्यसभेवर गेले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही संभाजीराजेंना संसदेत बोलू दिले नाही. सहा वर्षाच्या काळात संभाजीराजांची भाजपाने कोंडी करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे चंद्रकांत पाटील आणि संभाजीराजेंमधील वाद उफाळून आला. संभाजी राजेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. तसेच राज्यसभेसाठी रिक्त होणाऱ्या सहा जागांपैकी एका जागेसाठी संभाजीराजेंनी अपक्ष लढण्याची घोषणा केली. महाविकास आघाडी, सर्वच अपक्ष आमदारांच्या मतांवर राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा होईल, असा संभाजीराजेंचा अंदाज होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीला सुरुवातीला पाठिंबा दिला. मात्र शिवसेनेने दुसऱ्या आणि राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी दावा केल्याने पवार यांनी शिवसेनेला साथ देण्याचा निर्णय घेतला. संभाजीराजांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग यामुळे खडतर बनला आहे.
संभाजीराजांची व्यूहरचना : सद्यस्थितीनुसार संभाजीराजेंकडे एकही हक्काचा आमदार नाही. शिवाय, उमेदवारीला अनुमोदन देण्यासाठी १० आमदारांचा पाठिंबा लागेल, त्यांची ही जमवाजमव त्यांना करावी लागणार आहे. असे असताना संभाजीराजे अपक्ष उमेदवारीवर ठाम आहेत. मात्र ४२ आमदारांचे मताधिक्य गाठण्यासाठी त्यांना घोडेबाजार करावा लागेल. घोडेबाजार टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांतील मराठी समाजाच्या आमदारांना साद घालून मताधिक्य गाठण्याची क्लुप्ती लढवली आहे. मराठा समाजाच्या संघटना कामाला लागल्या आहेत. नेते, आमदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. परंतु, सत्ताधारी पक्षातील असो किंवा विरोधी पक्षातील आमदार पक्षादेश डावलून संभाजीराजेंना साथ देतील का.? हे पाहावे लागेल.
मताधिक्य कसे जुळणार? : महाविकास आघाडीकडे शिवसेनेचे ५५, राष्ट्रवादीचे ५४, काँग्रेसकडे ४४, इतर पक्षांचे आठ आणि अपक्ष आठ असे एकूण १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. तर भाजपाकडे १०६, रासप, जनसुराज्य पक्षाचा प्रत्येकी १ आणि अपक्ष ५ असे ११३ आमदारांचे एकूण संख्याबळ आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक तर शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकारच्या जोरदार दोन्ही उमेदवार सहज निवडून येतील. दुसरीकडे भाजपा दोन जागा निवडून आणेल. उर्वरित २२ मते आणि इतर पक्ष आणि अपक्षांची ७ अशी २९ मते भाजपकडे शिल्लक राहतील. त्यामुळे भाजपाने संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केले. परंतु, संभाजीराजेंनी भाजपाची मदत घेतली तरी सुमारे १३ मतांची गरज लागेल. हे संख्याबळ संभाजीराजे कसे जुळवणार याबाबत साशंकता आहे.
भाजपाची चाल देखील फसली : संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर नाकारावी, यासाठी भाजपाकडून विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा देण्याची घोषणा केली. छत्रपतींना सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यायला हवा, अशी भूमिका यावेळी मांडली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संभाजीराजांना दिलेला पाठिंबा काढून घेत फडणवीसांवर गुगली टाकली. भाजपाने त्यामुळे महाविकास आघाडीकडून संभाजीराजेंना डावलत असल्याचा प्रचार सुरू केला. मराठा संघटनाही यात उतरल्या. आघाडी सरकारमधील नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सर्वच घटक पक्षांनी शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे मतांचे विभाजन करण्याचा फडणवीस यांचा प्रयत्नही असफल झाल्याचे दिसून येत आहे.
साताराकरांच्या गादीला मान : पुरस्कृत आमदार म्हणून शिवसेनेने संभाजीराजेंना ऑफर दिली. छत्रपती घराणे आणि मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधामुळे राज्यसभेचा मार्ग मोकळा होईल, अशी संभाजीराजांना आशा होती. परंतु, शिवसेनेने दुसरा उमेदवार देण्याची घोषणा करत संभाजी राजेंची कोंडी केली. राजे पराभूत झाल्यास शिवसेनेसह महाविकास आघाडीने छत्रपती घराण्याचा पराभव केला, असा संदेश समाजमाध्यमात जाईल आणि भाजपा आगामी निवडणुकीत हा मुद्दा अस्मितेचा विषय बनवेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. मात्र सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत, साताराकरांनी 'मान गादीला आणि मत राष्ट्रवादीला' अशी मोहीम जोरदार चर्चेला आली होती. सातारकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना निवडून आणत, उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. छत्रपतींच्या विरोधात वातावरण निर्माण होऊन, सरकारला फटका बसेल, ही शक्यता देखील धूसर झाली आहे.
हेही वाचा - Shiv Sena Rajya Sabha Candidate Issue :...तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा मोठा सन्मान - संजय पवार