मुंबई - राज्यसभा निवडणुकीत भाजपा तिन्ही जागा जिंकत महाविकास आघाडी सरकारला जोरदार धक्का दिला. अपक्षांना आपल्या बाजूला वळविण्यात आणि काही मते फोडण्यात यशस्वी झालेल्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे ही निवडणूक भाजपाला जिंकता आली. भाजपाने आता त्यांच्या रिक्त होणाऱ्या पाच जागांवर सहा उमेदवार उभे केले आहेत. वास्तविक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रत्येकी सहा उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही बाजूने एकेका उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. मात्र विधान परिषद निवडणुकीत ( Legislative Council elections 2022 ) दोन्ही बाजूंनी आपल्याच विजयाचा दावा सुरू असल्याने पुन्हा एकदा निवडणूक लागली तर ती नक्कीच चुरशीची होणार आहे. 27 मतांचा कोटा यावेळेस असणार आहे. काँग्रेसकडे ( Congress ) असलेले बलाबल पाहता त्यांना आणखी दहा मते दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी आवश्यक आहेत. ही मते अपक्ष आणि मित्र पक्षांकडून मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
दोन्ही उमेदवार मुंबईचे : मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवार मुंबईचे दिले आहेत. या दोन उमेदवारांपैकी भाई जगताप यांचा पराभव करणे हा भाजपाचा उद्देश आहे. कारण भाई जगताप हे अधिक आक्रमक आणि प्रभावी नेते मानले जातात. मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने भाई जगताप आमदार होणे हे विरोधकांना परवडणारे नाही. म्हणूनच त्यांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येतो आहे. भाजपा व आपल्या सहाव्या जागेवर ठाम असून आपली सहावी जागा जिंकणारच, असा दावा भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.
'निवडणूक बिनविरोध होणे महत्त्वाचे' : महाविकास आघाडीने घटक पक्षातील प्रत्येक पक्षाने दोन-दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर भाजपानेही सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या दोन्ही आघाड्यांनी आपला एक एक उमेदवार मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल आणि त्याच दृष्टीने महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. कारण जर निवडणूक लागली तर ही निवडणूक पुन्हा एकदा महाविकास आघाडीला त्रासदायक ठरणार आहे. प्राधान्य क्रमांच्या मतांच्या गणितात पुन्हा एकदा भाजपा बाजी मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार अडचणीत येऊ शकतो. म्हणूनच नामुष्की टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी सांगितले.
'काँग्रेसला धोका नाही' : दरम्यान काँग्रेसला कोणताही धोका नाही. गत निवडणुकीतही आमच्याकडे संख्याबळ कमी होते, तरीही आम्ही सहज जिंकलो. राज्यसभेच्या निवडणुकीत मतांच्या बेरजेत आमच्या काही चुका झाल्या हे आम्ही मान्य करतो. मात्र या चुकांमधून आम्ही शिकलो आहोत, अशा चुका पुन्हा होणार नाही आणि महाविकास आघाडी सरकारचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
हेही वाचा - Sharad Pawar : राज्यसभेच्या निवडणुकीबाबत पवारांची नाराजी; आगामी निवडणुकीत काळजी घेण्याच्या सूचना!