मुंबई - बाजारातील गर्दी कमी झालेली नाही, मुंबईकर कोरोना नियमांचं पालन करत नाहीत. मुंबईतील वाढती गर्दी चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे मुंबईबाबत आजच्या आजच कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. त्यामुळे मुंबईत आज रात्रीपासून कठोर निर्बंध किंवा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतील कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज दादर मार्केटमध्ये जाऊन पाहणी केली. मुंबईत दररोज 5 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर विविध भाजी मंडईत जाऊन फेरीवाल्यांसह अनेक नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन करत होत्या. आता त्यांच्या पाठोपाठ मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील रस्त्यावर उतरत लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. अस्लम शेख यांनी दादर मार्केटला भेट देऊन नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. दरम्यान यावेळी त्यांनी मुंबईमध्ये लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याचे संकेत देखील दिले आहेत.
मुंबईतील वाढती गर्दी चिंताजनक
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज सकाळपासून मुंबईतील महत्त्वाच्या मार्केटला भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मार्केटमध्ये वाढत असलेली गर्दी पाहून चिंता व्यक्त केली. मुंबईकरांनी कोरोना नियमांचे पालन करावे, अन्यथा मुंबईत कोरोनाचा उद्रेक होईल. कोरोना नियमांचे पालन न केल्यास आजच लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येईल. असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. मुंबईतील लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. या चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान मार्च २०२० ते २ एप्रिल २०२१ या कालावधीत विनामास्क फिरणाऱ्यांकडून पालिका, पोलीस, रेल्वे प्रशासन यांनी दंडात्मक कारवाई करून, तब्बल ४९ कोटी १५ लाख ४६ हजार ८०० रुपयांची रक्कम वसूल केली आहे.
हेही वाचा - मुंबईत पुण्याच्या धर्तीवर निर्बंध लागण्याची शक्यता - महापौर किशोरी पेडणेकर