मुंबई- मुंबईसह देशातील प्रमुख बंदरांमध्ये कामगारांनी केंद्र सरकारच्या कामगार धोरणाविरोधात 5 एप्रिल रोजी एक दिवसाचा संप पुकारला ( Port Dock Workers Strike Mumbai ) आहे. या संपाचा परिणाम जलमार्गाने होणाऱ्या मालवाहतूककीवर मोठ्या प्रमाणात पडणार ( Impact On Waterway Freight ) आहे.
या प्रमुख मागण्यासाठी संप- मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉग अँड जनरल एम्प्लॉईज युनियनने दिलेल्या माहितीनुसार, मेजर पोर्ट ऑथोरिटी ऍक्ट 2021 मुळे बंदरावर व कामगारांना होणारे दुष्परिणाम यांची चर्चा करून मार्ग काढावा, मागील वेतन कराराची अंमलबजावणी करणे, मुंबई बंदरातील कामगार व सेवानिवृत्त कामगारांना मागील वेतन कराराची उर्वरित थकबाकी त्वरित द्यावी, 2020-21 च्या पी.एल. आर (बोनस) योजनेत पोलीस सुधारणा करावी बंदराचे खासगीकरण करण्यात येऊ नयेत, जवाहरद्वीप येथे मुरिंग कामाचे कंत्राटीकरण करू नये पेन्शन खंडातील तूट भरून काढणे या व इतर प्रमुख मागण्यासाठी 5 एप्रिल 2022 रोजी संपाचा निर्णय घेण्यात आला आहे.
संप शंभर टक्के यशस्वी होणार- या एकदिवसीय संपात मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉग अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉग वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन, फ्लोटीला वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट, स्थानिक लोकाधिकार समिती अशा अनेक संघटना संपात सहभागी होणार आहेत. हा संप यशस्वी करण्यासाठी आतापर्यंत पी.डिमेलो भवन, कामगार सदन, श्रमिक भवन, इंदिरा गोदीत विविध मिटिंग झाल्या आहेत. संप शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी कामगार नेते ऍड. एस.के. शेट्ये, सुधाकर अपराज, केरशी पारेख, विद्याधर राणेसारख्या कामगार नेत्यांनी मीटिंग घेऊन कामगारांना संपाबाबत मार्गदर्शन केले आहेत. त्यामुळे संप शंभर टक्के होईल, असा विश्वास मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉग अँड जनरल एम्प्लॉईज युनियनने व्यक्त केला आहे.