मुंबई - मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान (Aryan Khan) पकडला गेल्यानंतर त्याला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, असा गौप्यस्फोट या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार प्रभाकर साईल याने केला होता. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडे देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या एसआयटीने या प्रकरणात आतापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र या प्रकरणातील प्रमुख शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा (Pooja Dadlani) जबाब नोंद करण्याकरिता मुंबई पोलिसांच्या एसआयटीने (Mumbai Police SIT) पूजा ददलानी यांना दोन समन्स पाठवून सुद्धा त्या हजर राहिलेल्या नाहीत. आता पूजा ददलानी यांना तिसरा समन्स जारी करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याप्रकरणी पूजा ददलानी यांना काही दिवसांपूर्वी दुसरे समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्यांनी तपास यंत्रणेकडे काही वेळ मागितला होता. मुंबई क्रूझ ड्रग्जप्रकरणी आतापर्यंत २० जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभाग अधिकाऱ्यांविरोधात एसआयटी चौकशी केली जात आहे. त्या अधिकाऱ्यांविरोधात खंडणीच्या आरोपांची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी यांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र तब्येत खराब असल्याचे कारण देत त्यांनी एनसीबी चौकशीला येण्यास नकार दिला. तसेच मला थोडा वेळ हवाय असेही सांगितले आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात होता. त्यानंतर ८ ऑक्टोबरला त्याची रवानगी आर्थररोड जेलमध्ये करण्यात आली. तब्बल २६ दिवस आर्यन खान तुरुंगात होता. शुक्रवारी २९ ऑक्टोबर रोजी त्याला जामीन मंजूर झाला. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ३० ऑक्टोबर रोजी त्याला जामीनावर सोडण्यात आले. याप्रकरणी आर्यन खानसोबत सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांनाही जामीन मंजूर झाला आहे.