मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना ( Shivsena Going To Contest Sixth Seat ) आणि संभाजीराजे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार असल्याने ( Sambhajiraje Going To Contest Rajyasabha Independently ) निवडणुकीत रंगत वाढली आहे. आघाडीकडे एकूण मताधिक्यापैकी ४० आमदार अधिक आहेत. त्यातही एका आमदारांचे निधन झाले झाल्याने केवळ ३ मतांची जमवाजमव ( Gathering begins for three votes ) शिवसेनेला करावी लागेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर हे आव्हान असेल.
शिवसेनेची ऑफर; संभाजीराजे ठाम : संभाजीराजे राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून भाजपकडून राज्यसभेत गेले होते. मधल्या काळात संभाजीराजे आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले. मराठा आरक्षणप्रकरणी साथ न मिळाल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. आता त्यांनी राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या सहा जागांपैकी एका जागेवर दावा केला. मात्र, सत्ताधारी आघाडीकडे मताधिक्य अधिक असल्याने त्यांची कोंडी झाली. आमदारांची फोडाफोडी आणि पळवापळवी करूनच संभाजीराजेंना राज्यसभेवर जाता येईल. त्यासाठी लागणारे ४२ आमदारांचे मताधिक्य गाठणे कठीण आहे. अशातच भाजपसोबत खटके उडाल्याने त्यांची मदत मिळणे अशक्य आहे. शिवसेनेने संभाजीराजेंना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेकडून पुन्हा ऑफर देण्यात आली. संभाजीराजेंनी मात्र अद्याप ऑफर स्वीकारली नाही. त्यामुळे राज्यसभेची सहावी जागा कोणाच्या पदरात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून ताकद : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर ( Rajya Sabha Election For Six Seats )होताच, माजी खासदार संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिला. आघाडीतील एकूण मतांचा आढावा घेत शिवसेनेने सहाव्या जागेवर दावा केला. राज्यात महाविकास आघाडी सरकार असून १६९ इतके एकूण मताधिक्य आहे. शिवसेनेचे ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, ८ अपक्ष आणि ८ इतर पक्ष असे बलाबल आहे. या मतांवर शिवसेनेचा दुसरा आणि राज्यसभेचा सहावा उमेदवार सहज निवडून येईल, असा विश्वास आहे. परंतु, एकूण मताधिक्याच्या संख्येनुसार सहावी जागा जिंकण्यासाठी शिवसेनेला तीन मत कमी पडणार आहेत. त्यामुळे सहाव्या जागेसाठी पेच वाढला असून, शिवसेना या जागेसाठी ताकद लावताना दिसत आहे.
शिवसेना काय करणार? : राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजांना भाजपने संधी दिली. मात्र गेल्या सहा वर्षात संभाजीराजांना भाजपकडून त्रास दिल्याचे बोलेल जाते. त्यामुळेच संभाजी राजे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजात भाजपबाबत तीव्र नाराजी आहे. अशातच राज्यात भाजप आणि महाविकास आघाडी यामध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेने दिलेला प्रस्ताव संभाजीराजांनी फेटाळला आणि ते पराभूत झाले तर, राज्यसभेच्या निवडणूकीचे खापर भाजपवर फोडले जाईल. महाविकास आघाडीला देखील याची झळ पोहोचेल. त्यामुळे राज्यसभेवर शिवसेनेचा उमेदवार जाणार की संभाजीराजांना महाविकास आघाडी मदत करणार हे लवकरच पाहायला मिळेल.
अपक्षांच्या मताला किंमत : राज्यसभेची निवडणूक खुल्या पद्धतीने होते. त्यामुळे मत फुटण्याचा संभव कमी असतो. शक्यतो या निवडणुका बिनविरोध होत असतात. अशातच निवडणुकीपूर्वी पक्षाकडून व्हीप काढले जातात. या निवडणुकीत प्रतोदला दाखवून मतदान करायचे असते. त्यामुळे मते फुटु शकत नाहीत. सध्या ११ छोट्या पक्षांकडे १६ मते आहेत, त्यातील क्रांतीकारी शेतकरी पक्ष, प्रहार, बविआ, स्वाभीमानी महाविकास आघाडीशी बांधील आहेत. अपक्ष व छोटे पक्ष आजपर्यंत राज्यात सत्ताधारी पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. असे असले तरी अपक्षांच्या मतांची किंमत यावेळी मोठी असणार आहे.
असे आहे निवडीचे सूत्र : राज्यसभेचा खासदार होण्यासाठी मतांच्या कोट्याचे सुत्र ठरवले जाते. त्यानुसार राज्याची एकूण विधानसभा सदस्यसंख्या भागिले राज्यसभेच्या रिक्त जागा अधिक १ यानुसार कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येणार याचे गणित ठरते. सध्याच्या स्थितीनुसार राज्यात २८८ आमदार, राज्यसभेच्या ६ रिक्त जागा + १ म्हणजेच २८८÷६ = ४१.१४ +१= ४२.१४ म्हणजे एका जागेसाठी ४२ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजप आपल्या संख्याबळानुसार दोन खासदार निवडून आणू शकतो. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी १ खासदार निवडून आणू शकतात. मात्र सहाव्या जागेसाठी मताधिक्य जमवण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण होईल.
कोणाचे नशीब फळफळणार : राज्यसभेवर गेल्यावेळी महाराष्ट्रातून सहा खासदार निवडणूक गेले. भाजपकडून पियुष गोयल विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे हे सर्वाधिक तीन खासदार होते. तर शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून पी चिदंबरम यांचा समावेश होता. यंदा भाजपच्या विधानसभेतील जागा घटल्याने दोन जागा वाट्याला आल्या आहेत. या दोन जागांपैकी पियुष गोयल यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांची पुन्हा वर्णी लागेल. काँग्रेसकडून पी. चिदंबरम यांना संधी मिळणार की नवा चेहरा देणार याबाबत अद्याप सुस्पष्टता नाही. शिवसेनेकडून संजय राऊत फिक्स आहेत. मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे आणि ऊर्मिला मातोंडकर यांची नाव चर्चेत आहेत. परंतु संभाजी राजे शिवसेनेच्या वतीने लढल्यास दोन्ही नावे मागे पडतील. त्यामुळे राज्यसभेवर जाण्यासाठी कोणाचे भाग्य उजळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पक्षीय बलाबल :
महाविकास आघाडी
शिवसेना - ५५
राष्ट्रवादी - ५४
कॉंग्रेस - ४४
इतर पक्ष - ८
अपक्ष - ८
एकूण - १६९
भाजप व मित्रपक्ष
भाजप - १०५
रासप - १
जनसुराज्य - १
अपक्ष - ५
एकूण ११३
हेही वाचा : Ajit Pawar : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शरद पवारांचा शिवसेनेला शब्द : अजित पवार