मुंबई :- टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे पालघरमधील चिरोटी येथे कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. निधनाची बातमी धडकताच राज्यातील उद्योग जगतासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून दु:खद संवेदना व्यक्त केल्या जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Political leaders Reaction on Cyrus Mistry death आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून सायरन मिस्त्री यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान - "सायरस मिस्त्री यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. भारताच्या आर्थिक पराक्रमावर विश्वास ठेवणारे ते एक आश्वासक व्यापारी नेते होते. त्यांच्या जाण्याने वाणिज्य आणि उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांच्या संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री - "टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. ते केवळ एक यशस्वी उद्योजकच नव्हते तर एक तरुण, तेजस्वी आणि दूरदर्शी व्यक्तिमत्व म्हणून उद्योगक्षेत्रातही त्यांच्याकडे पाहिले जात होते. ही खूप मोठी हानी आहे.. माझी मनापासून श्रद्धांजली."
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री- ''प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ''
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री - " टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री जी यांचे पालघर, महाराष्ट्राजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाल्याबद्दल कळून खूप दुःख झाले.्यांच्या कुटुंबीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो."
शरद पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष - टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अकाली निधनाची धक्कादायक बातमी ऐकून खूप दुःख झाले. ते एक गतिमान आणि हुशार उद्योजक होते. कॉर्पोरेट जगतातील एक तेजस्वी तारा आम्ही गमावला.
सुप्रिया सुळे, खासदार - " टाटा समूहाचे माजी अध्यक्ष व माझे बंधुतुल्य सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला. मिस्त्री कुटुंबाशी आम्हा सर्वांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.या दुःखद घटनेमुळे मी आजचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलत आहे, याची कृपया नोंद घ्यावी. नवा कार्यक्रम लवकरच कळविला जाईल. तसदीबद्दल क्षमस्व."
नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री - ''बिझनेस टायकून सायरस मिस्त्री जी यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. देव त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना शक्ती देवो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती''
प्रफुल्ल पटेल, खासदार - ''टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या आकस्मिक आणि अकाली निधनाने धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.''
राहुल गांधी, कॉंग्रेस नेते - टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या निधनाच्या दु:खद बातमीने दु:ख झाले. ते देशातील सर्वात तेजस्वी व्यावसायिक मनांपैकी होते, ज्यांनी भारताच्या विकास कथेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि प्रशंसक यांच्याबद्दल माझ्या मनःपूर्वक संवेदना.
आदित्य ठाकरे, शिवसेना नेता - सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. देव त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. भारताने आज एक तरुण, उत्तम उद्योगपती गमावला. ओम शांती