मुंबई - मुंबईतल्या गोवंडी परिसरातून गेल्या 11 महिन्यांत 21 तरुणी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे बेपत्ता झालेल्या तरुणी जातात कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी आज भाजप नेते किरीट सोमैया यांनी गोवंडी पोलीस ठाण्याला भेट देऊन, पोलीस निरीक्षकांशी चर्चा केली. यावेळी सोमैया यांनी या बेपत्ता मुलींचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी केली आहे.
गोवंडीतून 21 मुली बेपत्ता झाल्या मात्र तपास का झाला नाही?
मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गोवंडी परिसरातून २९ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या अवघ्या १२ दिवसांत ७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर गेल्या वर्षभरात 21 मुली बेपत्ता झाल्या आहेत. मात्र अद्यापही पोलिसांना या मुलींचा शोध घेण्यात यश आले नाही. या बाबत माहिती घेण्यासाठी सोमैया हे आज गोवंडी पोलीस ठाण्यात गेले होते. गोवंडीतून 21 मुली बेपत्ता झाल्या, मात्र त्यांचा शोध का घेण्यात आला नाही असा सवाल किरीट सोमैया यांनी उपस्थित केला आहे.
महिला अत्याचारावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न
गेल्या काही दिवसांपासून 'लव्ह जिहाद' व महिला अत्याचाराचा प्रश्न राज्यात चांगलाच पेटला आहे. या दोन मुद्द्यावरून भाजपने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता त्यामध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मुंबईच्या गोवंडी परिसरातून 21 मुली बेपत्ता झाल्या आहेत. यावरून भाजपने सरकारवर निशाणा साधला आहे.
तरुणींना प्रलोभन देऊन त्यांच्यावर अत्याचार
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज गोवंडी पोलीस ठाण्यात जाऊन, पोलिसांशी चर्चा केली. व या बेपत्ता मुलींचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान या मुलींना प्रलोभन देऊन, जाळ्यात ओढले जात असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे.