मुंबई- ओलासारख्या टॅक्सी सेवेचा तुम्ही वापर करत असाल तर फसवणूक टाळण्याकरता तुम्हाला सावध राहावे लागेल. कारण, ओलाचे जुने व्हर्जन वापरून प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे बेकायदेशीरपणे उकळण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने कारवाई करून तीन कॅब चालकांना अटक केली आहे.
ओलासारख्या टॅक्सी कंपनीमध्ये काही कॅब चालक कंपनीचे अपडेटेड नसलेले जुने अॅप वापरून प्रवाशांकडून बेकायदेशीरपणे भाडे उकळत आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 ने तीन कॅब चालकांना अटक केली आहे.
ओला या कंपनीच्या माध्यमातून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फक्त नेरूळ, सानपाडा, खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेलसाठी जाणाऱ्या प्रवाशांची भाडे हे कॅब चालक स्वीकारत. ओला कॅब वाहनतळ ते प्रवासाचे शेवटचे ठिकाण या दरम्यान जीपीएस यंत्रणेचा गैरवापर करून ते अधिकचे अंतर दाखवित होते.
अशा प्रकारे करत होते लूट -
गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून सुरुवातीला या ओला कॅब चालकांकडून ते अधिक पैसे घेत आहेत का? याची शहानिशा करून घेतली होती. बनावट ग्राहक झालेल्या पोलिसांनी आरोपींच्या कॅबचा वापर करत नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यास सुरुवात केली होती. या दरम्यान मुंबईतील उड्डाणपूलावर कॅब आल्यावर काही वेळासाठी आरोपी चालकांनी जीपीएस बंद केले. काही अंतर पुढे गेल्यावर पुन्हा त्यांनी जीपीएस चालू केले. अशा प्रकारांमुळे मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचे अंतर हे 20 ते 25 किलोमीटर अधिक दाखवले जात होते. या किलोमीटरप्रमाणेच आरोपी प्रवाशांकडून भाडे घेते होते.
जुने व्हर्जन असलेल्या अॅपची 4 हजारांना विक्री
अटक करण्यात आलेल्या तीनही चालकांची पोलिसांनी चौकशी केली आहे. आरोपींनी जुने ओलाचे अॅप 3 ते 4 हजार रुपयांना 50 पेक्षाही अधिक ओला कॅब चालकांना विकल्याचे कबूल केले आहे.
दरम्यान, मुंबई शहरात अनेकदा टॅक्सी चालक मनमानीपणे भाडे आकारत असल्याचे प्रकार समोर आले होते. मात्र, पहिल्यांदाच अॅपद्वारे फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.