मुंबई - शहरी नक्षलवाद आणि कोरेगाव हिंसाचार प्रकरणात कवी वरवरा राव यांना अखेर सशर्त जामीन मिळाला आहे. वैद्यकीय कारणास्तव राव यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला. उच्च न्यायालयाने ८१ वर्षीय वरवरा राव यांना सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. राव २८ ऑगस्ट २०१८ पासून जामिनाच्या प्रतीक्षेत आहेत. न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पिटाले यांच्या खंडपीठाने सांगितले की, सहा महिन्यांनंतर वारवरा राव एकतर शरण जातील किंवा जामीन कालावधी वाढवू शकतात. वरवरा राव यांना मुंबईबाहेर जाऊ दिले जाणार नाही. त्यांना शहरात रहावे लागेल आणि कोणत्याही वेळी कोर्टाने सांगितले की तपासणीसाठी एजन्सीसमोर हजर रहावे लागेल. तसेच वरवरा राव कोर्टाच्या प्रक्रियेसंदर्भात कोणतेही जाहीर भाष्य करू शकत नाहीत. जामीन कालावधीत वरवरा राव सहआरोपींशी कोणताही संपर्क साधू शकत नाही.
१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार झाला आणि त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्या दरम्यान अनेक वाहनेही जाळली गेली.
वरवरा राव हे तेलुगू डाव्या विचारसरणीचे कवी आणि मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. ते त्यांच्या क्रांतीकारक कवितांसाठी ओळखले जातात. ते तेलुगु साहित्याचे प्रख्यात मार्क्सवादी समीक्षक मानले जातात. राव अनेक दशकांपासून अनेक विद्यार्थ्यांना या विषयावर शिकवत आहेत. राव हे वीरसम (क्रांतिकारक लेखक संघटना) चे संस्थापक सदस्य देखील आहेत.
हेही वाचा - शरद पवारांनी रद्द केले सर्व सामाजिक कार्यक्रम, कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर निर्णय