मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून लॉकडाऊन असल्याने मैदानांवर खेळण्यास आणि सरावास बंदी होती. हि बंदी राज्य सरकारने उचलत मैदानावर सराव करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत खेळाडूंनी केले आहे. मुंबईमधील कोरोना विषाणूचा फैलाव लवकरच थांबून क्रीडा स्पर्धा खेळण्याचीही परवानगी मिळू दे अशी प्रतिक्रिया आझाद मैदानावरील खेळाडूंनी ' ई टीव्ही भारत' शी बोलताना दिली आहे.
स्पर्धा खेळण्याचीही परवानगी मिळू दे -
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणी क्रीडा सराव करण्यास मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. क्रीडा सराव करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी क्रीडा स्पर्धा, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करू नये, असे शासन निर्णयात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर 'ई टीव्ही भारत' ने मुंबईच्या सुप्रसिद्ध अशा आझाद मैदानाचा आढावा घेतला. यावेळी तुरळक खेळाडू आज उपस्थित असल्याचे दिसले. गेले ९ महिने आम्ही घरातच सराव केला. आज पासून पुन्हा मैदानावर सराव करण्यास मिळत आहे. थोडे वेगळे वाटत आहे. सध्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी नाही. बसलाही गर्दी असते त्यामुळे येथे पोहचण्यास खासगी वाहने वापरावी लागत असल्याने आपल्याला सरावाला पोहचण्यास अडचणी येत असल्याचे येथील खेळाडूंनी सांगितले. मुंबईमधील कोरोनाचा प्रादुर्भाव संपून आम्हाला पुन्ह्या क्रीडा स्पर्धा खेळण्यास मिळू दे अशी अपेक्षाही या खेळाडूंनी व्यक्त केली आहे.
या नियमांचे करा पालन -
शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार क्रिकेटसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन व बॅडमिंटनसाठी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सराव करण्यास मान्यता देण्यात आली आहे. एकत्रित गर्दी न करता १० ते १५ खेळाडूंना ठरवून दिलेल्या वेळेत सराव करावा. १४ वर्षांखालील मुलांच्या सरावासाठी वेगळा वेळ असावा. ही मुले इतरांच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्यावी. सरावाच्या जागेचे, खेळ साहित्याचे प्रत्येक बॅचनंतर स्वच्छता राखावी, सॅनिटाईझ करावे. कोणत्याही खेळाडूला ताप, खोकला, सर्दी झाली असल्यास त्याला व त्याच्या पालकांना सरावाच्या ठिकाणी येण्यासाठी मनाई करावी. क्रीडा स्पर्धा, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करू नये. या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे असे शासन निर्णयात म्हटले आहे.
कोणत्या खेळांना परवानगी -
तिरंदाजी, सायकलिंग, तलवारबाजी, शूटिंग, ऍथलेटिक्स, योगा हे खेळ प्रत्यक्ष संपर्क नसलेले खेळ आहेत. त्यासाठी सराव करताना मार्गदर्शक तत्वाचे पालन करावे. फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, वेटलिफ्टिंग, लॉन टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, खो खो हे किमान मध्यम संपर्क असलेले खेळ आहेत. अशा सांघिक खेळांसाठी एकत्रित खेळाडूंच्या सरावाव्यतिरिक्त वैयक्तिक कौशल्य व शारीरिक तंदुरुस्तीसाठी मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे. कुस्ती, ज्यूदो, युशु, ताईक्वांदो, कराटे, बॉक्सिंग, वॉटरपोलो, कबड्डी हे खेळ प्रत्यक्ष संपर्क असलेले खेळ आहेत. त्यासाठी प्रशिक्षक व खेळाडू यांचा सतत संपर्क येणार असल्याने वैयक्तिक कौशल्य व शारीरिक तंदुरुस्तीसाठी मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे. जलतरण खेळासाठी मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे असे शासन निर्णयात म्हटले आहे.