मुंबई - महापालिकेच्या भांडुप येथील एस वॉर्ड कार्यालयाच्या जवळ पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. यामुळे भांडुप ते घाटकोपर या विभागात पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेचे भांडुप येथे एस विभाग कार्यालय आहे. या कार्यालयाजवळ क्वारी रस्ता येथे पाणी पुरवठा करणारी 900 मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन शनिवारी फुटली. पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले असून पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. पाईपलाईन फुटल्याने भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर आदी विभागात पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला वेळ लागणार असल्याने रविवारी सकाळी पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता पालिकेने वर्तवली आहे.