मुंबई - शहरात अनेक ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. ही कामे लॉकडाऊन लागू झाल्यापासून ठप्प आहेत. त्यामुळे ज्या 'एसआरए' प्रकल्पात बेसमेंट आणि पायाभरणीची कामे अर्धवट राहिली आहेत, ती कामे तत्काळ पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आता लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात पायाभूत सुविधा प्रकल्प, खासगी बांधकाम प्रकल्प यांसह एसआरए प्रकल्पांचीही कामे खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आली होती. मात्र आता पावसाळा जवळ आल्याने पावसाळ्याआधीची कामे सुरु होणे अत्यंत आवश्यक होते. पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये, तसेच डबक्यांमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी पावसाळा-पूर्व कामे करण्यास अखेर आज (गुरूवार) झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने परवानगी दिली आहे.
यासंदर्भात एक परीपत्रक जारी करत एसआरएने पावसाळ्याआधी करायची सर्व कामे सुरू करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत. मात्र, केवळ आणि केवळ पावसाळ्याआधीचेच काम करण्याचा इशारा कंत्राटदारांना देण्यात आला आहे. लॉकडाऊन उठल्यानंतरच प्रकल्पाच्या पूर्ण कामांना परवानगी दिली जाणार आहे.
हेही वाचा : नागपुरात ३ नव्या कोरोनाबाधितांची भर, तर ६ रुग्ण कोरोनामुक्त