मुंबई - विविध आजार असलेल्या तसेच अॅलर्जी असलेल्या लोकांना कोरोनाची लस दिल्यास त्यांच्या जीवावर बेतू शकते. अशाच जिवावर बेतू शकणाऱ्या ८ जणांना कोरोना लस न देता परत पाठवून देण्यात आले आहे. असे करून सायन रुग्णालयामधील लसीकरण केंद्राने पुढील अनुचित प्रकार टाळला आहे.
अॅलर्जी असलेल्याना लस नाही -
एखाद्याला अन्नापासून, औषधापासून अॅलर्जी असल्यास, प्रमाणाबाहेर डायबेटीस आदी आजार असलेल्या रुग्णांना लस दिल्यास त्यांच्या जीवावर बेतू शकते. काहींना घशात आणि शरीरावर सूज येणे, ताप येणे, अंगदुखी आदी आजार होऊ शकतात. यासाठी अशा रुग्णांना लस देऊ नये, असे केंद्र सरकारच्या गाईडलाईनमध्ये स्पष्ट केले आहे.
अॅलर्जी व इतर आजाराचे ८ जण -
केंद्र सरकारच्या गाईडलाईनमध्ये कोणाला लस द्यावी व कोणाला देऊ नये हे स्पष्ट असले तरी अशा आजारांची नोंद करण्याची तरतूद कोविन ऍपमध्ये नाही. यामुळे ज्यांना एलर्जी तसेच आजार असलेले लोक लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी येत आहेत. केंद्रावर विचारपूस करताना काल (मंगळवारी) ८ जण एलर्जी व इतर आजार असलेले आढळून आले आहेत. त्यांना लस दिल्यास त्यांच्या जीवावर बेतू शकते म्हणून लस न देता त्यांना परत पाठवण्यात आले. यात कॅन्सर आजारावर केमोथेरपी घेणाऱ्या गोवंडी शताब्दी रुग्णालयातील सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
कॅन्सरग्रस्त डॉक्टरलाही परत पाठवले -
गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनिल गोंधळे यांना कर्करोगाची लागण झाली आहे. २०१८ मध्ये ते कॅन्सर मुक्त झाले. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांना पुन्हा कॅन्सर झाला. त्यांच्यावर केमो थेरपी सुरू आहे. लसीकरणादरम्यान त्यांना शनिवारी बोलावण्यात आले होते. मात्र ते पोहचू न शकल्याने त्यांनी लस घेण्यासाठी मंगळवारी सायन रुग्णालय गाठले. त्यांना कर्करोग असल्याने परळ येथील टाटा रुग्णालयातून फिटनेस प्रमाणपत्र आणण्यास सांगण्यात आले. या लोकांना लस दिली असती तर या लोकांचे काही बरे वाईट होऊन त्यांच्या जीवावर बेतले असते.