मुंबई - पाकिस्तानी आणि बांगलादेशी यांना देशातून हकला ही भूमिका या मोर्चाची आहे. ज्यांना पाकिस्तान बंगलादेशी यांचा धोका वाटतो ते या मोर्चात सामील होतील असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले. संध्याकाळी मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या शिष्टमंडळाने मनसेचा मोर्चा सुरु होणार त्या हिंदू जिमखाना परिसराची पोलिसांसह पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.
9 फेब्रुवारीला गिरगाव हिंदू जिमखाना येथून दुपारी 12वाजता मोर्च्याला सुरुवात होईल. या मोर्चाचा समारोप दुपारी 3 वाजता राज ठाकरे यांच्या भाषणाने आझाद मैदान येथे होईल. जवळपास दीड लाख नागरिक या मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केला.
मनसेच्या महाअधिवेशनानंतर मनसेसैनिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट उपाधी देत बॅनर लावले होते. त्याला खुद्द राज ठाकरे यांनीच विरोध करत हिंदुहृदयसम्राट उपाधी न लावण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यानंतर आता मनसेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना हिंदूनायक उपाधी मनसे सैनिकांकडून लावण्यात येत आहे. याबाबत मनसे नेते नितीन सरदेसाई यांना विचारले असता, ही उपाधी कोण लावत याबाबत आम्हाला कल्पना नसल्याचे ते म्हणाले.
आम्ही कुठल्या संघटनांशी मोर्चात सहभागी होण्यासाठी बोलत नाहीत. ज्यांना राज ठाकरे यांचे विचार पटले आहेत ते या मोर्चात सहभाग नोंदवतील. काही लोकांनी स्पेशल टी शर्ट या मोर्चासाठी तयार केले आहेत हे कळत आहे. मात्र, पक्षाने कोणताही अधिकृत ड्रेसकोड तयार केला नसल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.