मुंबई - मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बोलले जाते. या शहरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नरिमन पॉईंट या विभागात अनेक मोठी व महत्त्वाची कार्यालये आहेत. या विभागात काम करणाऱ्या कामगारांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाने बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र सरकारी सुट्टीच्या दिवशी या विभागात जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्यात येत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
प्रवाशांच्या संख्येत वाढ -
मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी बेस्टचा हा एकमेव पर्याय आहे. यामुळे बेस्टच्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बेस्टने सध्या 27 लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फोर्ट, नरिमन पॉईंट, मंत्रालय, विधानभवन आदी परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यालये आहेत. यात सरकारी आणि खासगी कार्यालयाचा समावेश आहे. यात लाखो कर्मचारी काम करतात. यामधील बहुतेक कर्मचारी बेस्टच्या बसने प्रवास करतात.
प्रवाशांचे हाल -
या विभागातील कर्मचाऱ्यांसाठी बेस्टने बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. या मार्गावर 138, ए 25, 108, 115 या बसेस चालवल्या जातात. त्यापैकी 115 ही बस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीए या मार्गावर चालवली जाते. या बसने मंत्रालय, विधानभवन, नरिमन पॉईंट या विभागातील प्रवासी प्रवास करतात. यामुळे ही बस नेहमी प्रवाशांनी भरलेली असते. मात्र, सरकारी सुट्टीच्या वेळी, रविवारी ही बस सेवा बंद ठेवली जाते. यामुळे मंत्रालय, नरिमन पॉईंट, विधानभवन या परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना 138 या बसवर अवलंबून राहावे लागते. 138 ही बस लवकर येत नसल्याने व ही बस फिरून जात असल्याने मंत्रालय, नरिमन पॉईंट, विधानभवन परिसरात जाणाऱ्या प्रवाशांचा वेळही वाया जात आहे. तसेच कोरोना नियमांची पायमल्ली होत आहे. यासाठी सुट्टीच्या दिवशीही 115 ही बस सुरू ठेवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
तक्रार आल्यास बस सुरू करू -
दरम्यान याबाबत बेस्टच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील डेपोमधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुट्टीच्या दिवशी 115 क्रमांकाची बस बंद असल्याने त्याचा भार 138 क्रमांकाच्या बसवर येतो. सुट्टीच्या दिवशी 138 क्रमांकाच्या बसने प्रवास करणाऱ्या पैकी मंत्रालय, नरिमन पॉईंट, विधान भवन या परिसरात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. याबाबत बेस्ट प्रशासनाशी संपर्क साधला असता बेस्ट ही सेवा देणारी संस्था असून ती तोट्यात आहे. यामुळे काही प्रवाशांसाठी एखादा मार्ग चालवणे योग्य नाही. प्रवाशांनी एखाद्या मार्गावर बस सेवेबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी परिवहन विभागाला मेल किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारे संपर्क साधल्यास आढावा घेऊन बस सेवा सुरू केली जाऊ शकते, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - Diwali 2021 : साईनगरी दिव्यांनी उजळली, पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात