मुंबई - कोरोनामुळे मृत पावलेल्या आईचा मृतदेह घेण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने दीड लाख रुपयांचे बील जमा करण्यास सांगितले. मात्र संतप्त झालेल्या बिल्डर बाप-लेकाने वार्ड बॉय आणि कॅशियरला मारहाण करुन त्यांच्यावर रिवाल्वर रोखली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कांदिवली परिसरातील चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन्ही आरोपी फरार आहेत.
बांधकाम व्यावसायिक घनश्याम पताडिया याच्या 57 वर्षीय आईला 7 मे ला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना कांदिवली परिसरातील पार्वतीबाई चव्हाण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र 25 मेला त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर आईचा मृतदेह घेण्यासाठी घनश्याम पताडिया आणि त्यांचा मुलगा हॉस्पीटलमध्ये पोहोचले. मृतदेह नेण्यापूर्वी दीड लाख रुपयांचे बील जमा करण्यास कॅशियर प्रशांत अहिरे यांनी सांगितले. मात्र या दोघांनीही पैसे जमा करण्यास नकार दिला आणि वार्ड बॉय व कॅशियरला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर परवानाधारक रिवाल्वर काढत त्यांच्यावर रोखली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, हॉस्पीटल प्रशासनाने मृतदेह त्यांच्या ताब्यात दिल्यानंतरही बिल जमा न केल्याने कॅशियर प्रशांत अहिरेंनी चारकोप पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी रिवाल्वर जप्त केली असून दोन्ही आरोपी फरार आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.