मुंबई उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असला तरी विधान परिषद सदस्यत्वाचा अद्यापही राजीनामा दिलेला नाही. मात्र अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे एकदाही परिषदेत उपस्थित राहिले नाहीत. यावर स्पष्टीकरण देताना विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले की, शिवसेनेमध्ये सध्या मोठी फूट पडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे कार्यकर्ते आणि नेतेमंडळी भेटण्यासाठी येत आहेत. पक्ष जिवंत राहिला तर इतर गोष्टी करता येतील. त्यामुळे पक्ष संघटना आणि पक्ष वाढीच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी आता लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच विधान परिषदेचे सदस्य असूनही ते अधिवेशनात एकही दिवस हजर राहिले नसल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच अधिवेशनाच्या कामकाजात आदित्य ठाकरे यांनी पूर्णपणे सहभाग घेतला. यासोबत ते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दौरेही करत आहेत. जवळपास गेली बारा वर्षे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचे जबाबदारी दिली. तसेच आदित्य ठाकरे यांनाही सभेच्या माध्यमातून त्यांनी सक्रिय राजकारणात आणले. मात्र आता पक्षात पडलेल्या फुटीमुळे उद्धव ठाकरे हे पक्षाच्या कामाकडे लक्ष केंद्रित करत आहेत.
मुख्यमंत्री असल्यानेच नितिष कुमार यांनी झटका दिला महाराष्ट्र राज्या प्रमाणे दिल्लीतही सत्तांतर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र दिल्लीत भारतीय जनता पक्षाला ते जमलं नाही. तसेच बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाला झटका दिला. देशाच्या इतर राज्यांमध्ये देखील सत्तांतर करण्याचे प्रयत्न झाले. मात्र महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यात भारतीय जनता पक्षाला यश आले नाही. नितिष कुमार मुख्यमंत्री असल्यामुळेच भाजपाला झटका दिला. मात्र मी उपमुख्यमंत्री होतो म्हणून झटका देऊ शकलो नाही अशी मिश्किल टीका ही अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर यावेळी केली. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर अनेकजण टीका करत आहेत. मात्र कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची दखल देशपातळीवर घेतली गेली. सलग तीनवेळा देशातील पाच चांगल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांचे नाव होते हे देखील नाकारून चालणार नाही असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
मआवी सरकारने आर्थिक शिस्त लावली राज्यामध्ये 2 वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असताना आर्थिक शिस्त लावण्याचे काम अर्थमंत्री म्हणून आपण महाविकास आघाडी सरकार मध्ये केले. तीन अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचा आर्थिक डोलारा संभाळण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. मात्र आता त्यांच्या अहवालात नेमके काय आहे याबाबत अद्याप आपल्याला माहीत नाही. कोणत्या नवीन मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले असतील तर त्याबाबत लक्षपूर्वक बघितले जाईल असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
145 आमदारांचं पाठिंबा असेपर्यंत सरकार टिकणार राज्यातील सरकार किती वेळ टिकेल यावर भाकीत करणार नाही. मात्र जोपर्यंत सरकारकडे 145 आमदारांचा पाठिंबा आहे, तोपर्यंत राज्यात हेच सरकार राहणार आहे. मात्र एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये अद्यापही कायदेशीर लढाई सुरू आहे. हे प्रकरण घटनापीठाकडे गेले आहे. यावर घटनापीठ निर्णय देईल असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.