मुंबई - शहरातील शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या आवाजवी शालेय शुल्क विरोधात राज्यभरातील पालकांनी एकत्र येऊन आज आझाद मैदानात आंदोलन केले. या पालकांचे म्हणणे आहे की, शाळांनी आपल्या मुलांना काढून टाकण्याची सतत धमकी दिल्यामुळे सर्व पालक तणावग्रस्त आहेत. जर शालेय शुल्क भरले नाही तर मुलांना ऑनलाइन क्लासमध्ये बसू दिले जाणार नाही. अशा पद्धतीच्या धमक्या वारंवार येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या टर्मची फी न भरल्यामुळे अनेक शाळांनी अनेक मुलांचे ऑनलाईन शिक्षणही बंद केले आहे त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालून अशा शाळांवर कडक कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी 'फोरम फॉर फेअरनेस एज्युकेशन' या संघटनेने केली आहे.
याबाबत बोलताना या संघटनेचे पदधिकारी सुनील चौधरी म्हणाले की, मागील तीन महिन्यापासून विनाअनुदानित खासगी शाळांचे पालक त्यांच्याकडून शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शालेय शुल्क विरोधात आंदोलने करत आहेत. याबाबत अनेक तक्रारी देखील शासनाकडे केल्या आहेत. मात्र, तरीदेखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. पालक भरत असलेल्या शालेय शुल्कचा निर्णय मागील वर्षी सामान्य शालेय शिक्षणासाठी घेण्यात आला होता.
मार्च 2020 पासून टाळेबंदी झाल्यामुळे जानेवारी 2021 पर्यंत कोणत्याही शाळा कार्यान्वित नव्हत्या. तरीदेखील राज्यभरातील अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांचे पूर्ण शुल्क वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे आमची शासनाकडे विनंती आहे की, शाळांना देखील पालकांकडून त्याच हिशोबाने शुल्क आकारावे. त्यांना कमीत कमी 40 ते 50 टक्के फी दरामध्ये सवलत द्यावी. शाळांनी इतर अवाजवी शुल्क आहे ते घेऊ नये यामध्ये बसचे शुल्क, कॅन्टीन शुल्क, ग्रंथालय शुल्क, कॅलेंडर, पुस्तके, गणवेश यासोबतच इतर खेळांच्या ॲक्टिविटी याचेदेखील पैसे घेऊ नयेत अशी विनंती शासनाला आहे. या आंदोलनासाठी आज राज्यभरातून अनेक पालक आंदोलनासाठी आझाद मैदानात दाखल झाले होते. एकीकडे टाळेबंदीत नोकरी गेली त्यामुळे कुटुंब चालवणे मुशिकल झालं आहे तर दुसरीकडे शालेय शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे.