मुंबई- ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सहा जुलै पर्यंत अटक करणार नसल्याचे राज्य सरकारचे वकील डी. खंबाटा यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले.
अकोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्या विरोधात दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी याचिका कोर्टात दाखल केली आहे. ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती जामदार पीठासमोर परमबीर सिंह यांना 6 जुलैपर्यंत अटक करणार नसल्याची माहिती दिली. दरम्यान परमवीर सिंग यांनी केलेल्या याचिकेवर 5 जुलैला सुनावणी होणार आहे. अकोला शहराचे पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीनंतर परमवीर सिंग यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. भीमराव घाडगे यापूर्वी येथे पोलीस दलात कार्यरत होते. जेव्हा घाडगे ठाणे भागात कर्तव्य बजावत होते तेव्हा ठाणे शहराचे आयुक्तपद परमबीर सिंह यांच्याकडे होते.