मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या समर्थकांना पंकजा मुंडे मंगळवारी भेटणार आहेत. मुंबईतील वरळी येथील कार्यालयात पंकजा मुंडे समर्थकांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारीच त्या दिल्लीहून मुंबईला परतणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दिल्ली वारीनंतर समर्थकांची समजूत काढताना पंकजा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर
पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. पक्ष संघटनेच्या कामानिमित्त त्या दिल्लीत असल्या तरी, भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांनी भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचे देखील सूत्रांकडून समजते आहे. प्रीतम यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजीतून राजीनामे देणारे बीडसह मराठवाड्यातील मुंडे समर्थक उद्या पंकजा मुंडे यांची मुंबईतील वरळी येथील कार्यालयात भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
105 समर्थकांनी दिले राजीनामे
7 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. त्यामुळे बीडमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असलेल्या मुंडे समर्थकांनी राजीनामे देणे सुरू केले. आतापर्यंत जवळपास 105 पदाधिकार्यांचे राजीनामे दिल्याने भारतीय जनता पक्षात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
मी नाराज नाही- पंकजा मुंडे
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र आपण नाराज नसल्याचं पंकजा मुंडे यांनी 8 जुलैला पत्रकार परिषद घेऊन सांगितले होतं. तसेच मुंडे कुटुंबीयांनी कधीही कोणाकडे कोणतंही पद मागितलं नाही, हे देखील पंकजा मुंडे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा - जबरा फॅन! बारामतीतील कार्यकर्त्याने पाठीवर काढला शरद पवारांचा टॅटू