मुंबई - लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून वाहतूक सेवा बंद आहे. त्यामुळं अनेक चालकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. अद्याप शाळा सुरू करण्याबाबत अनिश्चितता असल्याने 'स्कूल बस' चालवणाऱ्या चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. आता सरकारनेच मदत करावी, असे आवाहन शालेय बस चालकांनी केले आहे.
सरकारने कमीतकमी साध्या प्रवासी वाहतुकीला परवानगी द्यावी, असे आवाहन शालेय बसचालक वाहकांनी केले आहे. अन्य राज्यांनी शालेय बसचालकांना मदत केल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारने देखील मदत पुरवावी, अशी मागणी बसचालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केली आहे.
मुंबईसह राज्यभरात मर्यादित मनुष्यबळांसह कार्यालये सुरू झाल्यानंतर नोकरदार वर्गासाठी रिक्षा-टॅक्सी, अॅपबेस्ड टॅक्सी यांची वाहतूक सेवा पूर्ववत झाली. तसेच, खासगी बसमालकांनी देखील प्रवासी वाहतूक सुरू केली. मात्र, स्कूल बस अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. मुंबईसह एमएमआरमध्ये १० हजार स्कूल बसवर २० हजार कुटुंबे अवलंबून आहेत. यात ९ हजार चालक, ४ हजार क्लीनर, ७ हजार महिला मदतनीस यांचा समावेश आहे. बेस्ट, एसटी संप झाल्यावर स्कूल बसला अत्यावश्यक सेवेचा दर्जा देत प्रवासी वाहतूक करण्याची मुभा देण्यात येते. मग आता प्रवासी वाहतुकीला परवानगी का नाही? असा प्रश्न देखील शालेय बस चालक संघटनांनी उपस्थित केला आहे. लॉकडाऊनमध्ये सवलती मिळाल्यानंतर अनेकांच्या कमाईचे स्रोत पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, स्कूल बसला प्रवासी वाहतूक करण्याची परवनागी नसल्याने त्यांचा रोजगाराचा प्रश्न कायम आहे.
नशिबी फक्त उपासमार
शहरातील माटुंगा परिसरात वास्तव्यास असणारे संतोष कदम मागील वीस वर्षांपासून स्कूल बस चालवतात. घरात एकटेच कमवणारे असल्याने महिन्याच्या पगारावर त्यांचे घर चालते. मात्र, आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावली आहे. सरकारनेच पुढाकार घेऊन बसचालकांना मदत पुरवावी, असे आवाहन कदम यांनी केले आहे.