मुंबई - मुंबईच्या गणेशोत्सवामध्ये लालबागच्या राजाला एक विशेष मान आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. लालबागच्या राजा हा लालबाग परिसरातील मसाला गल्ली भागात बसवला जातो. त्यामुळे त्याची मूर्ती बाहेरून न आणता या ठिकाणीच घडवली जाते. त्यांच्या पाद्यपूजनाच्या सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरूवात होते. त्यामुळे लालबागचा राजाच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष महत्त्व आहे. आज लालबागचा राजाच्या पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला.
ऑनलाइन दर्शनावर भर
दरवर्षी लालबागचा राजा म्हणजे सिंहासनावर आरुढ अशी गणपतीची मोठी मूर्ती डोळ्यांपुढे येते. पण यंदा कोरोना संकटाचे भान ठेवून सिंहासनावर आरुढ गणपतीची चार फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. दरवर्षी लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी उसळते. अनेक सेलिब्रेटी येतात. पण कोरोना संकटात गर्दी टाळण्यासाठी मंडळाने भक्तांना गर्दी टाळा आणि ऑनलाइन दर्शन घ्या, असे आवाहन केले आहे. मागच्या वर्षी कोरोना काळात रक्तदान शिबीर घेऊन लालबागचा राजा मंडळाने 'आरोग्य उत्सव' साजरा केला होता. गणपतीच्या मूर्तीची प्रतिस्थापना करणे टाळले होते. यावर्षी मंडळ चार फूट उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिस्थापना करुन साधेपणाने उत्सव साजरा करणार आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन उत्सव साजरा केला जाईल. भक्तांना ऑनलाइन पद्धतीने गणरायाचे दर्शन घेता येईल, असे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी याआधीच सांगितले आहे.
हेही वाचा -कलाकार आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक चर्चा