मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. तसेच आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच देशात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेने ऑक्सिजन साठ्याबाबत केलेल्या कामाची दखल सर्वोच्च न्यायालयाने देखील घेतली होती. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने महानगरपालिकेने कशाप्रकारे तयारी केली आहे, सध्या कशाप्रकारे ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे, याबाबत पालिकेच्या सर्वात मोठ्या जम्बो कोविड सेंटरपैकी एक असलेले मुलुंड जम्बो कोविड सेंटरच्या बाहेरून ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा...
मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने सुविधांचे केंद्रीकरण, अंमलबजावणीचे विकेंद्रीकरण आणि प्राणवायू, औषधे यांचे सुयोग्य व्यवस्थापन केले. यामुळे रुग्ण संख्या आटोक्यात येण्यास मदत झाली. आज मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत नाही. सर्वोच्च न्यायालयाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने देखील याचे कौतुक केले आहे. ऑक्सिजनचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन केल्यामुळेच तुटवडा भासत असतानाही मुंबईत दिल्ली किंवा अन्य राज्यांसारखी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नाही. मुंबईच्या मुलुंड येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये एकूण 1650 बेड आहेत. त्यातील 100 पेक्षा जास्त बेड हे रिकामे आहेत. तसेच 700 ऑक्सिजन बेड आहेत. त्याबरोबर ऑक्सिजन साठा ही बरोबर आहे. कोणताही तुटवडा सध्या जाणवत नाही. पालिकेने योग्यप्रकारे नियोजन केलं आहे असे मुलुंड येथील जम्बो कोविड सेंटरचे डॉक्टर अभय नाईक यांनी सांगितले.
हेही वाचा - पप्पांनी, केंद्राकडे तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला
मुलुंडमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये परिस्थिती नियंत्रणात
ऑक्सिजनची कमतरता -मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. हा प्रसार काही प्रमाणात कमी होत असतानाच फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली. शहरात झपाट्याने रुग्णसंख्या वाढू लागली. दिवसाला 7 ते 11 हजार रुग्ण आढळत होते. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन बेड, आयसीयू आणि व्हेंटिलेटर कमी पडू लागले. ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर न झाल्याने मागील महिन्यात एकाच दिवसात 168 रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयांतून इतर रुग्णालयात हलवावे लागले. मात्र त्यानंतर पालिकेने केलेलं नियोजन, वेळेवर केलेली धावाधाव यानंतरचा ऑक्सिजनची कमतरता ही मुंबईत नाही. या कोविड सेंटरमध्ये देखील योग्य प्रकारे सर्व व्यवस्था सुरू आहे. ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ऑक्सिजनची कमतरता पडू नये. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी ऑक्सिजन वेळेवर पोहचावा म्हणून पालिकेने 6 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबईमधील सर्व रुग्णालयांचा डेटा गुगल शीटवर नोंद करण्यात आला आहे.
मुलुंड कोविड सेंटरबद्दल थोडक्यात
मुंबई उपनगरातील मुलुंडमध्ये रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीच्या परिसरात मुबई महानगरपालिकेतर्फे 1 हजार 650 बेडची जम्बो कोविड केअर फॅसिलिटी तयार करण्यात आली आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे हे सेंटर आहे. यात तब्बल 500 हून जास्त ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी 26 हजार लिटर ऑक्सिजन बँकची व्यवस्था करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बेड असलेले हे पहिलेच सेंटर आहे. विशेष म्हणजे, हे कोविड केअर सेंटर संपूर्णपणे वातानुकूलित आहे. सेंटरमध्ये कॉन्टॅक्टलेस स्क्रिनिंग सेंटर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वेगळी मार्गिका, तसेच डेडिकेटेड वाय-फाय सुविधा देखील रुग्णांसाठी देण्यात आली आहे. सोबतच गरम आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता देखील या सेंटरमध्ये करण्यात आलेली आहे.
हेही वाचा - परसबागेसाठी भाजीपाला बियाणे किट; संचारबंदीत महिला मजुरांनाही मिळाले काम