मुंबई - शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांपैकी एक वरळी विधानसभा हा मतदारसंघ आहे. शिवसेनेचा गड असलेल्या वरळीमधून २००९ची विधानसभा निवडणूक सोडली तर सातत्याने शिवसेनेचाच उमेदवार निवडून येत आहे. त्यात आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करीत असल्याने साहजिकच हा मतदारसंघ शिवसेनेसाठी त्यांच्या राजकारणातील केंद्रबिंदू ठरला आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या मतांची टक्केवारी जास्त आहे. या मतदारसंघातून शिवसेनकडून सध्याचे आमदार सुनील शिंदे किंवा शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यापैकी कोणीही निवडणूक लढवली तरी विजय शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास येथील शिवसेना पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा... विधानसभेत 'वाघ-सिंह' एकत्र; मुख्यमंत्र्यांकडून युतीचे संकेत
शिवसेना नेते दत्ताजी नलावडे यांनी सातत्याने चार वेळा वरळी मतदारसंघाचे नेतृत्व केले. मात्र २००९ मध्ये मात्र कुख्यात गुंड आणि माजी आमदार अरुण गवळी यांचे भाचे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांनी ५२ हजार ३९८ मते मिळवत शिवसेनेच्या आशीष चेंबूरकर यांना पराभूत केले. चेंबूरकर यांना ४७ हजार मते मिळाली होती. २००९ च्या विधानसभेतील यशानंतर अहिर यांनी वरळी मतदारसंघात चांगलीच लोकप्रियता मिळविली. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत येथून ते पुन्हा निवडून येतील, अशी हमखास खात्री शरद पवार यांनाही होती. मात्र, शिवसेनेच्या सुनिल शिंदे यांनी अहिर यांच्यापेक्षा दुपटीने मते घेत त्यांचा पराभव केला.
सुनिल शिंदे यांनी १९८५ पासून शिवसेनेचे उप शाखा प्रमुख म्हणून पक्षात कामाला सुरुवात केली. २००७ मध्ये त्यांनी सर्वप्रथम नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रवेश केला. मात्र २००९ मध्ये त्यांच्याऐवजी पक्षाने आशीष चेंबूरकर यांना उमेदवारी दिली. चेंबूरकर यांचा पराभव करून अहिर निवडून आले. मात्र त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुनिल शिंदे यांनी अहिर यांचा पराभव केला.
हेही वाचा... 'मन'से जाणून घेणार कार्यकर्त्यांचा कौल; मुंबईत जिल्ह्याध्यक्षांची बैठक
इतर मतदारसंघाप्रमाणे याही मतदारसंघातील समस्या एकसारख्याच असल्या तरी बीडीडी चाळींचा पुनर्विकास आणि कोस्टल रोडला मच्छिमारांचा विरोध, हे येथील दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडच्या प्रकल्पाला वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी विरोध केला आहे. शिवाय बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा नारळ फोडण्यात आला असला तरी त्याला म्हणावी तशी गती मिळालेली नाही
ठाकरे कुटुंबीयांतील कोणी आजवर निवडणूक लढविली नसली तरी आदित्य ठाकरे मात्र राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्यात आदित्य यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची चाचपणी सुरू केल्याने वरळी मतदारसंघ विशेष चर्चेत आला आहे. आदित्य येथून लढणार असतील तर त्यांना कोणताही धोका ठरू नये यासाठीच सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. विशेष म्हणजे आदित्य यांनीच अहिर यांच्यासाठी मध्यस्थी केली. यामुळे आता शिवसेनेच्या विजयाचा कोणताच अडसर शिल्लक राहिलेला नाही, याची शिवसेनेला खात्री आहे.
हेही वाचा... ...आणि उद्धव ठाकरेंनी शशिकांत शिंदेंना दिली पक्षात येण्याची ‘ऑफर’
असा आहे वरळी विधानसभा मतदारसंघ
- एकूण मतदार - २,६५,०९१
- पुरुष - १,४९,०६७
- महिला - १,१६,०२४
वरळी विधानसभा २०१४ निकाल
- सुनिल शिंदे, शिवसेना- ६०, ६२५
- सचिन अहिर, राष्ट्रवादी -३७, ६१३
- सुनिल राणे, भाजप -३०, ८४९
- दत्तात्रय नवघणे काँग्रेस- ५,९४१
- नोटा - १५५९
- मतदानाची टक्केवारी -५५.९३ टक्के