मुंबई - कोविड-१९ विषाणू संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रतिपिंडाचे प्रमाण किती आहे, हे शोधण्यासाठी सिरो सर्व्हे करण्यात ( BMC Sero Survey ) आला. त्यात ९९.९३ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंड आढळून आली ( 99.93 Percent Workers Covid 19 Antibodies ) आहेत. लसीचे दोन डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा तुलनेत बूस्टर डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंडाचे प्रमाण अधिक आढळून आले आहे.
९९.९३ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंड - कोविड -१९ विषाणू संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचारी यांच्यामध्ये सहावे सिरो सर्व्हेक्षण ( BMC Six Sero Survey ) अर्थात रक्त नमुन्यांची चाचणी करुन प्रतिपिंड शोधण्याबाबतचे सर्व्हेक्षण करण्यात आले. संख्यात्मक दृष्ट्या प्रतिपिंड पातळी मोजणारे हे पहिलेच सर्व्हेक्षण होते. एकूण ३ हजार ०९९ पैकी तब्बल ३ हजार ०९७ म्हणजे ९९.९३ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंड आढळली आहेत. विशेष म्हणजे, लसीकरणाचे डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात बूस्टर डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंडाची पातळी अधिक आढळली आहे. सहा महिन्यांनी याच व्यक्तींचे प्रतिपिंड पातळी मोजणारे दुसरे सर्व्हेक्षण होणार आहे. अश्या स्वरूपाचे भारतातील हे कदाचित पहिलेच सर्व्हेक्षण आहे. लसीकरणाचा प्रभाव किती काळ आणि कसा टिकतो, याचा अभ्यास याद्वारे होत असल्याने ते एकूणच लसीकरणाबाबत दिशादर्शक ठरणारे आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
यांचे घेण्यात आले रक्ताचे नमुने - मार्च 2022 मध्ये 3 हजार 099 कर्मचाऱ्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात प्राथमिक स्तरीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा विचार करता, महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागातून सामूदायिक आरोग्य कार्यकर्ता, सहायक प्रसविका परिचारिका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, बहुउद्देशीय कार्यकर्ता मिळून ७२६ कर्मचारी समाविष्ट होते. द्वितीय स्तरीय आरोग्य सेवेतून १५ उपनगरीय रुग्णालय आणि २ प्रमुख रुग्णालयातून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी मिळून ६३२ जण सर्व्हेक्षणात समाविष्ट झाले. तर क्षेत्रीय आरोग्य सेवा लक्षात घेता ४ वैद्यकीय शिक्षण रुग्णालयातून १८६ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना ह्यात समाविष्ट करण्यात आले. आघाडीवरील कर्मचाऱ्यांमध्ये बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमाच्या २५ आगारातून ७७६ आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातून ७७९ कर्मचारी यात सामावून घेण्यात आले.
सर्व्हेक्षणाची वैशिष्ट्ये आणि निष्कर्ष -
• सहभागी कर्मचाऱ्यांचे सरासरी वय ४३ वर्षे
• पुरुष संख्या ५८.१ टक्के तर महिला ४९.९ टक्के
• एकूण ३ हजार ०९७ म्हणजे ९९.९३ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये आढळली सिरो सकारात्मकता
• ९९.३५ टक्के कर्मचाऱ्यांनी घेतली होती कोविड लस. पैकी ९६.७ टक्के जणांनी कोविशिल्ड तर ३.३ टक्के जणांनी घेतली होती कोव्हॅक्सिन लस
• ३६.५ टक्के कर्मचाऱ्यांनी घेतली प्रतिबंधात्मक लस (बूस्टर डोस)
• सहभागी कर्मचाऱ्यांपैकी १५.९ टक्के जण मागील दोन वर्षात आढळले कोविड बाधित
• कोविड लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये रक्तातील प्रतिपिंड पातळी ही लस घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी
• कोविड बाधा झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये इतरांच्या तुलनेने प्रतिपिंड पातळी अधिक
• दोन मात्रा घेतलेल्यांच्या तुलनेत बूस्टर डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंड पातळी काहीशी जास्त
• कोविडचा नैसर्गिक संसर्ग झालेल्या आणि लस घेतलेल्या अशा संकरित प्रतिकार क्षमता असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सरासरी प्रतिपिंड पातळी अधिक
हेही वाचा - Aryan Khan Case : आर्यन खान प्रकरणात मुंबई एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित