मुंबई - महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांचे देशद्रोही दाऊदशी असलेले संबंध आणि त्यांना झालेली अटक यावरून गेला आठवडाभर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपाचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लागून धरली. तर सत्ताधाऱ्यांनी नवीन सदस्यांचा परिचय, राज्यपालांचे अभिभाषण, 6250 कोटींच्या पुरवणी मागण्या, विधेयक, अशासकीय विधेयक, नामनिर्देशित तालिका सभापती आणि शोक प्रस्ताव गोंधळात पुकारत एकमताने संमत केली. शोक प्रस्तावावर सभापतींनी भावना वक्त करत दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.
जोरदार घोषणाबाजी -
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणापासून सुरुवात झाली. विधानसभेत राज्यपालांचे आगमन होताच सत्ताधाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय तर विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देणात आल्या. त्या गोंधळातच वंदे मातरमला सुरुवात झाली. त्यांतर राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधकंकडून घोषणाबाजी सुरू राहिली. त्यामुळे राज्यपालांनी आपले अभिभाषण आटोपते घेत सभागृह सोडले.
शोक प्रस्ताव मांडून वाहिली आदरांजली -
विधान परिषदेत देखील याचे पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बोलण्यासाठी दोन मिनिटांचा अवधी मागितला. सभापती रामराजे नाईक यांनी संमती देताच मलिक यांच्या राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. हा विषय नियमांत बसत नसल्याचे सांगत सभापती फेटाळून लावला. विरोधकांनी यामुळे गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळात सभापतींनी कामकाज रेटून नेले. तसेच भारतरत्न गायिका लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज, रामनिवास सत्यनारायण सिंह, नारायण ज्ञानदेव पाटील, शिवसेना नेते सुधीर जोशी, माजी मंत्री दत्तात्रय लंके, विधान परिषद सदस्य संजीवनी हरी रायकर, आशाताई मारोतीअप्पा टाले, कुमुद माधव रांगणेकर यांच्या निधनाबाबत सभापती रामराजे निंबाळकर यांनी शोक प्रस्ताव मांडून आदरांजली वाहिली आणि दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.
राज्यपाल नव्हे, तर भाज्यपाल -
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे अभिभाषण आवरते घेत विधानपरिषद सोडण्याच्या घटनेचा सत्ताधाऱ्यांकडून निषेध करण्यात आला. विधानभवनाच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोरच शिवरायांची प्रतिमा स्थापन करून त्यांनी तिथेच ठिय्या मांडला आणि राज्यपाल हटावाच्या घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेच्या सदस्य मनीषा कायंदे म्हणाल्या की, राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे राज्याच्या प्रगतीचा आढावा असतो. परंतु हे राज्यपाल म्हणजे भाज्यपाल आहेत. त्यांना महाराष्ट्राची प्रगती पाहवत नाही. त्यामुळेच अभिभाषण न करता निघून आले. इतकेच नव्हे तर राष्ट्रगीत न म्हणताच निघून आल्याने त्यांनी राष्ट्रगीताचाही अवमान केला आहे. अशा राज्यपालांना हटविण्याची आम्ही मागणी करत आहोत, असे कायंदे यांनी सांगितलं.