मुंबई - शिंदे गटाच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीला पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर राज्यात शिंदे-भाजपचे सरकार आलं. सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या कामांना ब्रेक लावला आहे. त्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला येत नाही, असा इशारा अजित पवारांनी दिला ( ajit pawar criticized shinde bjp government ) आहे.
'इतक्या खालच्या पातळीवर...' - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यालयात अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने घेतलेले विकासाच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे. स्वतः एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. तरीही मुख्यमंत्री झाल्यानंतर आता त्यांनी विकासकामांना स्थगिती देण्याचं सुरू केलं आहे. इतक्या खालच्या पातळीवर आजपर्यंत कधीही राज्यांमध्ये राजकारण झालं नव्हतं. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला येत नाही, असा इशारा अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
'...या जनतेचा अपमान' - मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही न होणे म्हणजे हा जनतेचा अपमान आहे. या दोन मंत्र्यांनाच राज्य चालवायचा आहे का? दोघांनाच दोघांचे सरकार चांगलं वाटतंय का?. राज्यात महाविकास आघाडी सरकार असता 18 जुलैला पावसाळी अधिवेशन घेण्याचे ठरलं होत. मात्र, राज्यात झालेल्या सत्तापालटानंतर 25 जुलै रोजी अधिवेशन घेण्याची माहिती समोर येत होती. मात्र, अद्यापही अधिवेशनाची तारीख ठरलेली नाही. अद्यापही अधिवेशनाची तारीख न ठरला या जनतेचा अपमान आहे. त्यामुळे तात्काळ राज्य सरकारने अधिवेशन बोलवावे, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
'राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा' - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांने केलेल्या पेरण्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पावसाने जमिनी वाहुन गेल्या असून घराचीही मोठया प्रमाणावर पडझड झाली आहे. स्थावर मालमत्तेचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पंचनामे अजुनपर्यंत होऊ शकले नाहीत. पूर्वीच या दोन्ही विभागामध्ये शेतकरी अडचणीत असताना मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होण्याचे प्रमाण निदर्शनास आले आहे. यावर तातडीने त्यांना एक दिलासा म्हणून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टींने व आत्महत्या होऊ नये, याकरिता या दोन्ही विभागांमध्ये व राज्याच्या इतर विभागामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अजित पवारांनी केली आहे.
'शिंदे-फडणवीस यांच्या हातात काहीही नाही' - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात काहीही नाही. दिल्लीत गेल्याशिवाय तेथून हिरवा कंदील मिळाला. शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काहीही करता येत नाही, असा खरमरीत टोला अजित पवारांनी लगावला आहे.
हेही वाचा - Arjun Khotkar : दोन दिवसांपूर्वी बंडखोरांना 'उंदीर' म्हणणारे शिवसेनेचे 'अर्जुन' शिंदे गटात?; चर्चेला उधाण